नाशिक : केंद्र आणि राज्य स्तरावरून नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात सुरु असलेल्या पर्यटनविषयक कामांचा आढावा राज्याचे पर्यटन मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी घेतला. या वेळी त्यांनी गंगापूर धरणातील पाण्याच्या स्थितीचीही पाहणी केली. आतापर्यंत गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण २४.६८ टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिली.
यावेळी महापालिकेचे आयुक्त संजय खंदारे, अप्पर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, एम टी डी सी च्या प्रादेशिक व्यवस्थापिका प्रज्ञा बढे-मिशाळ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता म.कि. पोकळे, कार्यकारी अभियंता अनिल म्हस्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शासनाकडून आलेल्या निधीचा विनियोग याच आर्थिक वर्षात करावा अश्या सूचना दिल्या आणि या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक जमीन तात्काळ पर्यटन खात्याला वर्ग कराव्या असे आदेश दिले.
नाशिक शहराची आजवरची ओळख एक धार्मिक स्थळ, औद्योगिक शहर म्हणून आहे, यापुढे शासनाने नाशिक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला यावे यासाठी भारतातील गोड्या पाण्यातील जलक्रीडा केंद्र, साहसी, चित्तथरारक खेळांचे केंद्र विकसित करण्याचे ठरविले आहे. याठिकाणी बोट क्लब, संगीत कारंजे, मनोरंजन पार्क इत्यादी पर्यटन विषयक कामे होत आहेत. नाशिक परिसरात साहसी गिर्यारोहणाची ठिकाणे वन आणि सा.बा. विभागाच्या माध्यमातून विकसित होत आहेत त्यासाठी दिलेल्या पर्यटन निधीचा आही कामांचा आढावा भुजबळ यांनी घेतला. लवकरच नाशिक हे भारतातील प्रसिध्द राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री ना.छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
भारतातील पहिले मातीचे धरण म्हणून गंगापूर धरण ओळखले जाते. या ठिकाणी मनोरंजन पार्क व बोट क्लब ही विकासकामे करण्याचे प्रयोजन आहे. धरणाच्या खालील बाजूस मनोरंजन पार्क अंतर्गत पर्यटकांच्या सोयीसाठी रेस्टॉरंट, होटेल असणार आहे. गंगापूर धरणावर पर्यटकांना धरणाचे देखावे पाहण्यासाठी व बसण्यासाठी पॅव्हेलियन, संगित कारंजे, मनोरंजन पार्क अंतर्गत बगीचा,लॅण्ड स्केपिंग, मुलांकरिता खेळणी, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी अॅम्पीथिएटर,स्टेज व पार्किंग सुविधा इत्यादि कामे होणार आहेत.
बोट क्लब अंतर्गत बोटीपर्यंत जाण्यासाठी जिप जाऊ शकेल असा तीन प्लॅटफॉर्म असलेला 270 मी.लांबीचा जेटी ब्रिज बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी चित्तथरारक खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बोटी, पॅराग्लायडींग , ऍरो स्पीड बोट ,स्कुटर्स ,क्याकस बोटी , बनाना बोटी , रिगल बोटी , पारसेलींग बोटी व रिव्हर वॉक सिस्टिम इत्यादी विविध प्रकारच्या बोटी उपलब्ध असतील. बोट क्लब साठी सुसज्ज वाहनतळ , भुमिगत गटारी, डांबरी रस्ता बांधण्यात येणार आहे.
आणखी दमदार पावसाची गरज - भुजबळ
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणात काहीसा पाणीसाठा वाढला असला तरी परिस्थिती चिंताजनकच असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आणखी दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. आजमितीस गंगापूर धरणात २४.६८ टक्के, कश्यपी धरणात ९.४४ टक्के तर गौतमी धरणात १३.२७ टक्के पाणी साठा असल्याची माहिती पालकमंत्री भुजबळ यांना देण्यात आली.