नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;
जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून ३० कोटींची फसवणूक करणारा संशयित आरोपी अखेर जेरबंद
येवला
येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून तब्बल २९ कोटी रुपयांची फसवणूक करून गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयित आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करत आरोपी दौलतराव शंकरराव ठाकरे याला पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात दि. ०७/११/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि व्यवस्थापक यांनी संगनमताने चुकीच्या नोंदी करून, ठेवीदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्या ठेवींची रक्कम परत केली नव्हती. या फसवणुकीमध्ये ठेवीदार आणि सभासदांची एकूण २९,०२,४१५.३१ रुपये (सुमारे २९ कोटी रुपये) एवढ्या रकमेची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीला पकडण्यासाठी विशेष मोहीम
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेताना या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबीरसिंग संधु आणि पोलीस उपअधीक्षक श्रीमती जे. एम. करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.
या पथकातील पोलीस निरीक्षक श्री. राजू सुर्वे, पोलीस हवालदार प्रवीण मासुळे, कैलास काकड, मोहन पवार आणि इतर सहकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा शोधला. त्यानुसार, फरार असलेल्या संशयित आरोपी दौलतराव ठाकरे याला बोईसर येथून अटक करण्यात यश आले.
न्यायालयाकडून पोलीस कोठडी
या प्रकरणातील इतर आरोपी अद्यापही फरार आहेत. अटक केलेल्या संशयित आरोपीला न्यायालयाने दि. ३०/०८/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलीस त्याच्याकडून गुन्ह्याशी संबंधित अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या अटकेमुळे फसवणूक झालेल्या ठेवीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.