येवल्यात चार दिवसीय तालुकास्तरीय तंत्रस्नेही कार्यशाळेत ९७ शिक्षक तंत्रसाक्षर


 

येवल्यात चार दिवसीय तालुकास्तरीय तंत्रस्नेही कार्यशाळेत ९७ शिक्षक तंत्रसाक्षर


येवला,ता.४ : अध्ययन-अध्यापन अधिक सुलभ आणि सहज करायचे असेल तर प्रत्येक शिक्षकाने मोबाइल व संगणक साक्षर व्हायलाच हवे,याच विचारधारेतून प्राथमिक शिक्षकांची चार दिवशीय तालुकास्तरीय पार पडली.यातुन तंत्रज्ञानाला साद घालत संगणकावर खाते खोलण्यासह अध्यापनासाठी आवश्यक तंत्रज्ञानातील नवनविन गोष्टी शिक्षकांनी आत्मसात केल्या.

पुस्तकाद्वारे ज्ञानार्जन करताना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात माहितीचे भांडार पटवून देण्यासाठी 'ई-लर्निंग'चा प्राथमिक शाळांनी अंगिकार केला आहे.हे काम गतिमान व्हावे यासाठी प्राथमिक शिक्षकांना तंत्रस्नेही होण्याचे धडे देण्यात आले.विद्या प्राधिकरण (डायट) व शिक्षण विभागाच्या वतीने चार दिवसात दोन टप्प्यात कार्यशाळा बाभूळगाव येथील शासकीय आश्रमशाळा येथे हसतखेळत पार पडली.कार्यशाळेसाठी एकूण ९७ प्रशिक्षणर्थ्यानी सहभाग घेतला.

'एकच ध्यास तंत्रज्ञानातून विकास' या उक्तिस अनुसरून तज्ञ मार्गदर्शकांची तळमळ व त्याहून प्रशिक्षणार्थ्यांचा तंत्रज्ञानाप्रति उत्साह ही या कार्यशाळेची वैशिष्ट्ये होती.तज्ञ मार्गदर्शक म्हणून गजानन उदार,राकेश बेडसे,शांतीनाथ वाघमोडे,सीमा गायकवाड़,आशा पगारे,अनिता शिरोळे,मनीषा सोनवणे,शीला चव्हाण यांनी काम पाहिले

तर अशोक रेड्डी,सलीम मुजावर,राम कुलकर्णी,संदेश झरेकर यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.गुरुजीना कार्यशाळेत जीमेल अकाउंट उघडणे, गूगल फॉर्म तयार करणे,गूगल ड्राइवचा वापर,ऑनलाइन टेस्ट तयार करणे,क़ुआर कोड तयार करणे व ते रीड करणे,कविता व शैक्षणिक विडियो निर्मिती,पीपीटी निर्मिती, विविध शैक्षणिक ऍप्सचा वापर,जीआयफ फाइल,यू टयूब चॅनेल व ब्लॉग क्रिएशन आदि तंत्रज्ञानाशी निगडित गोष्टीचे ज्ञान मिळाले.विद्या प्राधिकरणाचे प्रशिक्षण प्रमुख श्री.खारकेयांनी भेट देऊन प्रेरणादायक माहिती शिक्षकांना दिली.

प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक गजानन उदार यांनी व्हाटस अप वापरामधील बारकावे सांगताना ते सुरक्षितपणे कसे वापरावे याविषयी तसेच ऑनलाईन टेस्ट बनवण्याचे मार्गदर्शन केले.सीमा गायकवाड यांनी मोबाईलद्वारे व्हिडिओ कसे बनवायचे,युटूब वर कसे अपलोड करायचे याविषयी मार्गदर्शन केले.तसेच स्वतःचा युटूब चॅनेल कसा तयार करावा याचे ऑनलाइन प्रात्यक्षिक घेतले. श्रीमती शिरोळे व राकेश बेडसे यांनी पीपीटी मधील प्रत्येक घटक व त्यानुसार प्रात्यक्षिक करवून घेतले. पीपीटीमध्ये विद्यार्थ्यांसाठी टेस्ट तयार करण्याची महत्वपूर्ण माहिती दिली.शांतीनाथ वाघमोडे यांनी ऑफलाईन टेस्ट कोणत्याही डेटा खर्चाशिवाय कशी तयार करायची याचे प्रात्यक्षिक दाखवले.पीपीटीच्या मदतीने शालेय कार्यक्रमांबरोबरच पाठयपुस्तकातील घटकांवर आधारित व्हिडिओ तयार करण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.

  

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने