शिक्षकांना जुनी पेन्शन मिळेपर्यत मीही पेन्शन घेणार नाही
आमदार किशोर दराडे यांचा मुंबईतील आंदोलनात इशारा
येवला : प्रतिनिधी
शासनाने पेन्शन योजनेत केलेला बदल कर्मचाऱ्यावर अन्यायकारक आहे.राज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन मिळेपर्यत मीही पेन्शन घेणार नाही असा इशारा शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी मुंबईतील आंदोलनात दिला.
राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिवनेरी ते मंत्रालय पेन्शन दिंडी व सत्याग्रह आंदोलनात बुधवारी मुंबईत हजारो आंदोलकांसमोर बोलतांना त्यांनी हा इशारा दिला.शिक्षकांनी दोन दिवस आझाद मैदानात बेमुदत उपोषण केले.यावेळी दराडे यांनी शिक्षक नेत्यांशी चर्चा करून मागण्याबाबत शासनाकडे आग्रही भूमिका घेऊ असे आश्वासन दिले.या मागण्याचे निवेदन यावेळी दराडे यांना पेन्शन हक्क समितीतर्फे देण्यात आले.1 मे 2005 पासून सेवेत आलेल्या राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. 1982 ची जुनी पेन्शन योजना आणि 1984 ची भविष्य निर्वाह निधी योजना बंद केल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांना 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.या नव्या पेन्शन योजनेला सरकारी कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असतानाही सरकारने पेन्शन दिंडीला परवानगी नाकारत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र हे आंदोलन चिरडले जाणार नाही, तर उसळी घेणार असल्याचे शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिला.
जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास, त्याच्या पत्नीला मिळणारे निवृत्तीवेतन, विकलांग मुलगा वा मुलीस मिळणारे कुटुंब निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी सात लाखांच्या मर्यादेत तसेच भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली संपूर्ण रक्कम नव्या पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला द्यावी. जुन्या योजनेप्रमाणेच नव्या पेन्शन योजनेतही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणतीही रक्कम कापू नये, पेन्शनची तरतूद सरकारने करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.
या सर्व मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्याकडे पाठपुरावा करून विनाअनुदानित शाळांना अनुदान देणे व ज्यांना २० टक्के जाहीर झाले त्यांना पुढील टप्पा अनुदान देण्याची देखील मागणी करणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.
फोटो Yeola 4_4 व 5
मुंबई : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांसमोर बोलतांना शिक्षक आमदार किशोर दराडे