तलाठ्याविना डोंगरगावचे ग्रामस्थ त्रस्त...
येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील डोंगरगाव येथे गेल्या दोन वर्षे सात महिन्यांपासून सजेसाठी स्वतंत्र तलाठी नाही.त्यामुळे सजेतील डोंगरगाव,वाघाळे, अाडसुरेगाव, पिंपळखुटे आदी गावांतील शेतकऱ्यांना महसुली कामासाठी येवलामार्गे अंदरसुल येथे जावे लागते. डोंगरगाव ते अंदरसुल हे अंतर ३० किमी पडते , येवून जावून ६० किमी अंतरामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे.त्यामुळे सजेसाठी स्वतंत्र तलाठी मिळावा व हे शक्य नसेल तर डोंगरगाव पासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या भारम सजे च्या तलाठ्याकडे कार्यभार द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे येवला तहसिलदार व प्रांत अधिकारी यांचेकडे केली आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सजेच्या तलाठी श्रीमती ईगवे यांची दोन वर्षे सात महिन्यांपूर्वी सायगाव येथे बदली झाली तेव्हा त्यांचा कार्यभार अंदरसुल साजेचे तलाठी पी.एस.चोपडे यांचेकडे सोपविण्यात आला होता. मात्र तेव्हापासून चोपडे हे आजपर्यंत एकदाही डोंगरगाव सजा कार्यालयात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना महसुली कामासाठी येवलामर्गे अंदरसुल येथे वारंवार जावे लागते.गेल्यावर तलाठी कार्यालयात भेटतीलच याची खात्री नसते. तलाठ्यास फोन केला तर ते शेतकऱ्यांना हॉटेलवर किंवा बस स्थानकावर बोलावतात.काम न झाल्यास पुन्हा चकरा माराव्या लागतात.या सजेअंतर्गत गावांतील शेतकऱ्यांना अद्याप २०१६-१७ चे बोंडअळी नुकसानीचे अनुदान मिळाले नाही.तसेच नवीन दुष्काळी अनुदानापासून सजा वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सजेसाठी लवकरात लवकर स्वतंत्र तलाठी मिळावा किंवा हे शक्य नसेल तर भारम सजेच्या तलाठ्याकडे कार्यभार सोपवून शेतकऱ्यांची सोय करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनात यापूर्वी दोन वेळा दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देण्यात आला आहे.तसेच आमचेवर आंदोलन करण्याची वेळ येवू देवू नये अशीही विनंती करण्यात आली आहे.निवेदनावर भारम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय वेनुनाथ सोमासे , ग्राम पंचायत सदस्य बाळासाहेब सोमासे,एकनाथ सोमासे, जगन सोमासे ,बंडू सोमासे, नानासाहेब सोमासे, कचरू सोमासे, भगिनाथ सोमासे,सुभाष चव्हाण,श्रावण सोमासे, मनकर पगारे आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.