भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात मुस्लिमांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले... प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी




भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात मुस्लिमांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले...
प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी. 

येवला: पुढारी वृत्तसेवा




भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील लढ्यात अनेक मुस्लिम समाजातील नेत्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्य आंदोलनाच्या दोन्ही पर्वात अर्थात स्वातंत्र्यलढ्यापूर्वीचे व स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन यामध्ये असंख्य अल्पसंख्याकांनी सहभाग घेऊन बलिदान दिलेले आहे, मात्र भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास लिहितांना जाणीवपूर्वक मुस्लिम समाजास दूर ठेवण्यात आले असल्याची खंत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध विचारवंत  प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी येवले येथे बोलतांना व्यक्त केली. 
       समता प्रतिष्ठान येवला ही संस्था  गेल्या 24 वर्षांपासून विज्ञाननिष्ठ, विवेकवादी समाजाच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या विचारधारेच्या अधीन राहून प्रागतिक विचार व्याख्यानमाला आयोजित करते. यावर्षीही 26 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कोविड - १९ चे सर्व नियम पाळून ऑनलाइन पद्धतीने ही व्याख्यानमाला पार पडत आहे. या व्याख्यानमालेचे 3 रे पुष्प भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात अल्पसंख्यांकांचा सहभाग या विषयावर गुंफतांना मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी बोलत होते. 
        वक्त्यांचा परिचय व स्वागत समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गमे यांनी करुन दिले तर या पुष्पाच्या अध्यक्षस्थानी दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार राकेशजी गिरासे हे होते.
          यावेळी बोलताना श्री तांबोळी म्हणाले की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात शेकडो मुस्लिम सैनिक व प्रमुख होते. अनेक महत्त्वाच्या पदावर मुस्लिम समाजाने एकनिष्ठपणे त्या ही काळात कार्य केलेले आहे, मात्र याचा शिवरायांच्या इतिहासात फारसा कोठेही उल्लेख आढळत नाही असे नमूद करून अल्पसंख्याकांसाठी इतिहासाची पाने झाकली गेली होती काय? असा प्रश्न ही श्री. तांबोळी यांनी उपस्थितांना केला.  स्वातंत्र्यापूर्वीच्या इतिहास सांगतांना झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे व तत्सम काळातील तत्कालीन अल्पसंख्यांकांच्या सहभागाचा उल्लेख केला. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनातील अल्पसंख्यांकांचा सहभाग सांगताना महात्मा गांधीजींचे संरक्षक बखत मियाँ, हरीयानाचे मिर बेग हुकूमचंद जैन, पानीपतचे स्त्री-पुरुष समानतेचे प्रतीक अल्ताफ हनी शायर, मौलान मैयमुद हसन, मुस्लिमांचे संत ज्ञानेश्वर म्हणून ज्यांची ओळख समाजाला असावी असे मौलाना अबूल कलाम आझाद यांच्या कार्याची गौरवगाथाही त्यांनी यावेळी विषद केली.  मौलाना आझाद यांचे समाजाच्या उद्धारासाठी व स्वातंत्र्यासाठीचे योगदान, त्यांचे शिक्षण विषयक विचार देखील त्यांनी मांडले पण त्यांच्या कार्याची इतिहासाने कधीच दखल घेतली नाही याची देखील त्यांनी खंत यावेळी तांबोळी यांनी व्यक्त केली. 
          संविधान निर्मितीत देखील एका मुस्लिम महिलेचा असलेल्या सहभागाचा कोठेच उल्लेख नसावा ही देखील खेदाची बाब आहे. जय हिंद चा नारा देणारा अबीद हसन तसेच भारताचा तिरंगा निर्माण करणारी सुरय्या तैयबजी या एकाही अत्यसंख्याक मुस्लिमांचा कोठेच उल्लेख नाही. स्वातंत्र्यपूर्व आंदोलनातील आणि स्वातंत्र्य आंदोलनातील मुस्लिमांचे योगदान आपण नाकारू शकत नाही. इंग्रजांविरूद्ध लढतांना १८५७ च्या लढ्यात मारल्या गेलेल्या एकूण शहीदांपैकी ५०% लोक हे मुस्लिम मारले गेले. जालियनवाला बाग हत्याकांड झाला, त्यामध्ये ज्या शहिदांच्या  कबरी बांधण्यात आल्या, त्यामध्ये ९०% मुस्लिमांच्या कबरी आहेत. त्याशिवाय १९२१ मध्ये जेंव्हा केरळमध्ये आंदोलन झाले, त्यावेळेस 3000 मुस्लिम लोकांना फासावर दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या पराभवानंतर निवडून आणतांना बंगालच्या मुसलमानांनी बाजी लावून त्यांना निवडून आणले. आज जे जातीय राजकारण केले जाते त्यातून मुस्लिम कसे देशविरोधी आहे हे सांगितले जाते त्या अनुषंगाने उदाहरण देतांना डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले की, भारत छोड़ो आंदोलनाची सुरुवात झाली तेंव्हा परकीय मालावर बंदी घातली गेली, तेंव्हा हाजी समसुद्दीन यांनी साखर कारखाना विकून टाकला तर  बाटा कंपनी देखील एका मुस्लिम व्यक्तीची होती, त्यांनीही आपली कंपनी बंद करून परदेशी मालावर बहिष्कार टाकुन त्याची होळी केली अशा अनेक अल्पसंख्याकांचे  योगदान यावेळी श्री. शमसुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त करुन इतिहासाच्या पुनर्लेखनाची नितांत गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. 
        ऑनलाइन सुरु असलेल्या या तिस-या विचार पुष्पाचे सुत्रसंचलन प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे संचालक कानिफनाथ मढवई यांनी केले तर वक्त्यांचे व उपस्थितांचे आभार सुप्रसिद्ध गझलकार सचिन साताळकर यांनी मानले. 
       याप्रसंगी येवल्याचे लोकप्रिय माजी आमदार मारुतीराव पवार, प्रा. भरत कुमार सिन्हा,  रमेश कोथमिरे, सतिश गायधनी, प्रा. डॉ. भाऊसाहेब गमे, संजीवनी शिरगुप्पे, सुधाताई पाटिल मुख्याध्यापक दिनकर दाणे, रामनाथ पाटील, पंडीत मढवई, बाबासाहेब कोकाटे, आप्पासाहेब जमधडे, सलिल पाटिल, सुकदेव आहेर,  गणेश गाढे, भाऊसाहेब जगताप, आप्पासाहेब शिंदे, हेमंत पाटिल, शिवाजी साताळकर, हिरामण पगार, गोरख खराटे व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, समता प्रतिष्ठानचे सर्व कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभागी होते.
थोडे नवीन जरा जुने