महापरिनिर्वाण दिनी येवला ‘मुक्तीभूमी’ला शासनाकडून 'ब' वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा प्राप्त




महापरिनिर्वाण दिनी येवला 'मुक्तीभूमी'ला शासनाकडून 'ब' वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा प्राप्त

येवला मुक्तीभूमीच्या विकासाला मिळणार अधिक चालना - पालकमंत्री छगन भुजबळ

येवला : पुढारी वृत्तसेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला मुक्तीभूमी या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी 'ब' वर्ग तिर्थ स्थळाचा दर्जा दिला असून बाबासाहेबांचा वारसा जपण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने देशभरातील अनुयायांना विशेष भेट दिली आहे. याबाबत शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुक्तीभूमी या तीर्थ स्थळाला 'ब' वर्ग प्राप्त झाल्याने आता या ऐतिहासिक मुक्तीभूमीच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ऐतिहासिक महत्व असलेल्या येवला मुक्तीभूमीला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे  प्रयत्न होते. हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. त्यांच्या विशेष प्रयत्नाने या  प्रस्तावास आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मंजुरी देण्यात आली असून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

येवला शहर हे नाशिक निफाड औरंगाबाद रस्ता व मालेगांव मनमाड कोपरगांव अहमदनगर रस्त्यावरील एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे. या भूमीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श होऊन त्यांनी याठिकाणी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या जागेस विशेष असे अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यादृष्टिने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येवला नगरपरिषद क्षेत्रातील मुक्तीभुमीच्या जागेचा विकास केलेला आहे.  

याठिकाणी दरवर्षी १३ ऑक्टोबर, विजयादशमी, १४ एप्रिल तसेच प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी लाखो अनुयायी येत असतात. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित असतो. यास्तव या जागेस  तीर्थक्षत्राचे स्वरुप तयार झालेले आहे. सदरची जागा ही 'मुक्तीभूमी' करीता आरक्षित आहे. सदर मुक्तीभूमीचा विकास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी देखभाल व दुरुस्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे बार्टी या संस्थेमार्फत केली जाते. या जागेचे महत्त्व लक्षात घेवून, सदरील जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विश्वभुषण स्तुपाचे १३ कोटी किंमतीचे बांधकाम पूर्ण झालेले असून त्यामध्ये विश्वभुषण स्तुप, भगवान गौतम बुद्धाची मुर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इ. कामे करण्यात आली आहेत व टप्पा -२ अंतर्गत प्रशिक्षण केंद्र, भिख्खु निवास, भिख्खु पाठशाला, अॅम्फीथेटर, कर्मचारी ३ व ४ यांची निवासस्थाने व बगीचा इ. कामे प्रस्तावित आहेत. 

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने  मुक्तीभूमीला  'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्याने आता या तीर्थ स्थळाच्या विकासाला अधिक गती प्राप्त होणार आहे. तसेच या तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी शासनच्या वतीने अधिक निधी प्राप्त होऊन या तीर्थ क्षेत्राच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने शासनाकडून मिळालेली ही भेट देशभरातील अनुयायासाठी अतिशय महत्वाची असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने