सौ. पहिलवान यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार

येवला - भारतीय जनता पक्षाचे येथील नगरसेवक सुनील काबरा यांनी नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजश्री प्रवीण पहिलवान यांचा एकमेव अर्ज राहिला असून, त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार हे निश्‍चित झाले आहे. सोमवारी (ता. 26) होणाऱ्या विशेष सभेत सौ. पहिलवान खुर्चीवर विराजमान होतील. 


आज माघारीचा दिवस असल्याने सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी नगरसेवक काबरा यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्याकडे माघारीचा अर्ज सुपूर्द केला. या वेळी शिवसेना नगरसेवक व सूचक सागर लोणारी उपस्थित होते. दरम्यान, माघारीच्या वेळी नगरसेविका उषाताई शिंदे, संभाजी पवार, दिनकर पाटील, भाजपचे शहराध्यक्ष मनोज दिवटे, धनंजय कुलकर्णी, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, भाजपचे नगरसेवक बंडू क्षीरसागर, माणिकलाल शर्मा, रिजवान शेख, उमेश पटेल, डॉ. किशोर पहिलवान आदी उपस्थित होते. 


सोमवारी दुपारी बाराला पालिकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होणार आहे. प्रथम नगराध्यक्षांची निवड, नंतर उपनगराध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. उपनगराध्यक्ष व स्वीकृतसाठी सोमवारीच पालकमंत्री छगन भुजबळ नावे जाहीर करतील. त्यामुळे कुणाची वर्णी लागणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे; तर नगराध्यक्षपदासाठी पहिलवान यांची फक्त औपचारिक घोषणाच बाकी आहे. या वेळी स्वीकृत नगरसेवकांसाठी डॉक्‍टर, पदवीधर, इंजिनिअर, वकील व नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा पाच वर्षे अनुभव असलेला सदस्यच पात्र राहणार आहे. 


दरम्यान, भुजबळ यांनी नावाची घोषणा केल्यानंतर पहिलवान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पालिका निवडणुकीत "राष्ट्रवादी'ला 16 जागा मिळाल्या असून, अपक्ष 2; तर कॉंग्रेसच्या एका नगरसेवकाने पाठिंबा दिल्याने "राष्ट्रवादी'चे संख्याबळ 19 नगरसेवकांवर गेले आहे. राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता पालिकेत आली आहे. भाजपचे नगरसेवक सुनील काबरा यांनी नगराध्यक्षपदासाठी अंतिम क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. "राष्ट्रवादी'ने 13 नगरसेवकांना शहराबाहेर सहलीला पाठविले असून, कॉंग्रेसचा एक नगरसेवकही बरोबर आहे
थोडे नवीन जरा जुने