दुष्काळप्रश्‍नी उदासीन लोकप्रतिनिधींना जाब विचारा राजापूरच्या दुष्काळी परिषदेत जयंत दिंडे

येवला - वारंवार पाणीटंचाई निर्माण होत असूनही कायमच्या उपाययोजना करण्यात अपयश येत आहे. आता तर दुष्काळाची दाहकता भयावह आहे. नागरिकांची होरपळ सुरू असून हाताला काम, प्यायला पाणी, जनावरांना चारा अत्यावश्यक बनला आहे. काही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष पुरवण्यात तयार नाहीत, अशा उदासीन लोकप्रतिनिधींना जाब विचारा असे खुले आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांनी केले.
राजापूर येथे झालेल्या दुष्काळी परिषद व शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर प्रारंभी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी आमदार कल्याणराव पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या उपस्थितीमुळे हा मेळावा चर्चेचा ठरला. याशिवाय शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर कोठरे, दिनेश आव्हाड, सागर लोणारी, महेश आव्हाड, दत्तात्रय वैद्य, वाल्मीक गोरे, विठ्ठल महाले, रावसाहेब नागरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. राजापूर गाव ही मोठी ताकद आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन समस्यांसाठी लढा उभारावा. एकत्रित येऊन ग्रामसभा बोलवा, त्यात विकासाचा व पाणीयोजनेचा प्लॅन तयार करू, असे आवाहन थोरे यांनी केले. पुढारी व अधिकारी तुमच्या मागण्या धुडकावून लावत असतील तर तहसील कार्यालयावर मोर्चा काढा, शिवसेना व मीही तुमच्या सोबत राहील, असे माजी आमदार पाटील म्हणाले. या गावाला संघर्षाची पार्श्‍वभूमी असून शून्यातून उभे राहून गावाने प्रगती साधली आहे. यापुढे तरुणांनी पाणीप्रश्‍नासह विविध प्रश्‍नी पुढे यावे व आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हा कर्मचारी बँकेचे अध्यक्ष महेश आव्हाड यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने