महिलांनी स्व-मताने मतदान केल्यास या देशात क्रांती होईल – प्रा. राजश्री फडके –नान्दुर्डीकर


 


महिलांनी स्व-मताने मतदान केल्यास या देशात क्रांती होईल – प्रा. राजश्री फडके –नान्दुर्डीकर
येवला - वार्ताहर
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात 'जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख वक्त्या  म्हणून 'प्रा .राजश्री फडके –नान्दुर्डीकर बोलत होत्या. यावेळी डॉ.सुरेश कांबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ.भाऊसाहेब गमे हे कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी होते .
प्रा .राजश्री फडके यांनी भारतीय संस्कृतीमध्ये  प्राचीन काळात स्त्रियांना अतिशय मानाचे स्थान होते. स्त्रिया शिक्षण घेत होत्या. वैज्ञानिक संशोधन करत होत्या, असे सांगून गार्गी, मैत्रेयी अरुंधती या विदुषीचीनावे त्यांनी उधृत केली. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन साजरा करण्यामागची  पार्श्वभूमी त्यांनी विषद केली.पारंपरिक पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेमुळे स्त्रियांवर होणारे अन्याय  अत्याचाराचे प्रमाण आता कमी झालेले असले तरी ते पूर्णपणे थांबलेले नाही. अजूनही स्त्रियांच्या हक्कांसंदर्भात आंदोलने  झाली की समाजातून त्याला विरोध होतो. 'स्त्रिया आणि मतदानाचा हक्क'  या विषयावर देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क आपल्या स्व-मताने बजावल्यास देशात मोठी क्रांती होईल असेही त्या म्हणाल्या .
'बाईशिवाय घराला नाही घरपण, 
हे घरपण सांभाळताना तिचे झाले सरपण'
अशा काव्यमय शैलीत मांडणी करत डॉ. सुरेश कांबळे यांनी आपल्या मनोगतात स्त्रीचा त्याग , समर्पण, कष्ट आणि तिची महानता वर्णन केली. प्रसृतीशास्त्रातील तज्ञ असणारे डॉ. कांबळे पुढे म्हणाले की स्त्री ही स्वयंपूर्ण शक्ती आहे. स्त्री अर्भकांचे मृत्यू दर कमी असणे हा त्याचा पुरावा आहे. तरीही आज या समाजात दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्त्री सुरक्षित नाही, इतकेच काय पण ती मातेच्या गर्भातदेखील सुरक्षित नाही. स्त्री सुरक्षेच्या आणि सबलीकरणाच्या संदर्भात अनेक कायदे केले गेले तरी त्यांची प्रभावी अमलबजावणी होत नाही ही खंतही त्यांनी व्यक्त केली. स्त्री शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हावी तसेच ती मानसिक दृष्ट्याही सक्षम होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. 
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. भाऊसाहेब गमे यांनी सर्वाना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक तसेच भारतीय स्त्रीवादी चळवळीचा आढावा घेताना साहित्यातून उमटलेल्या स्त्रीवादी जाणीवा आणि स्त्रीवादी चळवळीचा अनुबंध त्यांनी स्पष्ट केला. हल्ली फॅशनच्या आहारी जाऊन तरुणी आरोग्याची हेळसांड करतात असे सांगून विद्यार्थिनीनी आरोग्याबाबत काळजी घ्यावी, प्रसारमाध्यमांच्या स्वप्नाळू दुनियेतून स्वतःला सांभाळावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जी. डी. खरात यांनी केले तर अतिथींचा परिचय प्रा. पंढरीनाथ दिसागज यांनी करून दिला. कार्यक्रमाला प्रा. आर. एन. वाकळे, प्रा. ए.पी. बागुल, प्रा. शिवाजीराव गायकवाड, प्रा. डी. व्ही. सोनवणे, प्रा. टी. एस. सांगळे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. वाय.टी. पवार उपप्राचार्य शिरीष नान्दुर्डीकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनराज धनगर यांनी केले तर आभर प्रा. हर्षल बच्छाव यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येनं उपस्थितीहोती.


थोडे नवीन जरा जुने