दरसवाडी ते डोंगरगाव पोहोच कालव्याचे अस्तरीकरण करा आमदार नरेंद्र दराडे : आढावा बैठकीत मांजरपाडयाचे काम सुरु करण्याची मागणीदरसवाडी ते डोंगरगाव पोहोच कालव्याचे अस्तरीकरण करा

आमदार नरेंद्र दराडे : आढावा बैठकीत मांजरपाडयाचे काम सुरु करण्याची मागणी

 

येवला : प्रतिनिधी

वर्षानुवर्षे दुष्काळी असलेल्या भागाला मांजरपाडा प्रकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.लोक काम पूर्ण होण्याची आतुरतने वाट पाहताय.मांजरपाडासह इतर कामांना शासनाने निधीची तरतूद केली असल्याने ही कामे तत्काळ सुरू करावीत तसेच येवला व चांदवड मधील दुष्काळी गावांना जलसंजीवनी देण्यासाठी दरसवाडी ते डोंगरगाव या पोहोच कालव्याचे अस्तरीकरण करावे अशी मागणी आमदार नरेंद्र दराडे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

आमदार दराडे यांच्या पुढाकारातून आज नाशिक येथील सिंचन भवनात मांजरपाडा प्रकल्प व पुणेगाव दरसवाडी पोहच कालव्याच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली.यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्याकडे दराडे यांनी ही आग्रही मागणी केली.यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीश संघानी,नांदूरमधमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव,सहाय्यक अभियंता विश्वास दराडे,चेतन पवार तसेच दराडे यांच्यासह शिवसेनेचे सर्जेराव सावंत,काँग्रेसचे नेते अरुण आहेर,पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यावेळी उपस्थित होते.

मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्यासाठी शासनाने सुप्रमा मंजूर करून निधी धरला आहे.त्या कामाला तातडीने सुरुवात करावी अशी मागणी करत दुष्काळी भागाला पाण्याचा पुरेपूर लाभ द्यायचा असेल तर पूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करा.यासाठी सुमारे १७० कोटींचा खर्च येणार आहे.पाण्याच्या योग्य वापर होण्यासाठी अस्तरीकरनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी सूचना दराडे यांनी केली.याकामाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांकडे बैठकीचा आग्रह धरू असे दराडे यांनी यावेळी सांगितले.मांजरपाड्याच्या प्रलंबित कामांनाही चालना देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

दरसवाडी डोंगरगाव दरम्यान ठेकेदारांनी ठिकठिकाणी अर्धवट काम ठेवल्याने चाचणीदरम्यान पाणी अडले होते.हे दराडे यांनी निदर्शनास आणून दिल्यावर मधल्या भागातील सोडलेले काम पंधरा दिवसांत पूर्ण करू तसेच पावसाने धरण भरल्यास चाचणीसाठी पाणी सोडण्याचे आश्वासनही अहिरराव यांनी यावेळी दिले.नगरसूल जवळ कालव्याच्या रेल्वे क्रॉसिंगचे काम एका महिन्यात पूर्णत्वास जाईल असेही त्यांनी सांगितले.यावेळी दराडे यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांचीही माहिती घेत मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

पाहणी करत बैठकीला...

दरम्यान या बैठकीला जाण्यापूर्वी दराडेंसह सहकाऱ्यांनी तळवाडे येथे लाभक्षेत्रातील शेतकऱयांची बैठक घेऊन चर्चा केली.राहिलेल्या कामाचा पाठपुरावा करून डोंगरगाव पर्यंत पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शेतकर्यांनी यावेळी केले.या कामांना चालना मिळावी यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दराडे यांनी दिले.यानंतर दरसवाडी पर्यंत कालव्याची पाहणी करून सर्व पदाधिकारी बैठकीसाठी नाशिककडे रवाना झाले.

फोटो

नाशिक : मांजरपाडा प्रकल्प व पुणेगाव दरसवाडी पोहच कालव्याच्या कामासंदर्भात आढावा बैठकिप्रंसगी उपस्थित आमदार नरेंद्र दराडे,लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव व अधिकारी,पदाधिकारी

 थोडे नवीन जरा जुने