कांदा उत्पादक शेतक-याची दखल घेऊन किमान एक हजार रूपये अनुदान द्या!
येवला- पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील शेतकरी एकदोन रूपये किलो कांदा भावामुळे हैराण झाला आहे.मागील वर्षी जूनमध्ये येवल्यात "कांदा उत्पादन व व्यापार" परिषद घेऊन संभाव्य कांदा प्रश्नावर सविस्तर मांडणी करून भावी समस्यावर उपाय सुचविले होते.परंतु केंद्र सरकारने याची दखल न घेता जैसे थे ठेवून उन्हाळ कांद्याला नोव्हेंबर पासून चार ते पाच हजार रूपये क्विंटल भाव मिळायला पाहिजे होता तो 400-500 रूपये क्विंटल विकण्याची वेळ आली आणि डिसेंबर नंतर तर कांदा चाळीत सडुन गेला.
ज्यावेळी कांद्याला चांगले भाव मिळायला लागले कि केंद्र सरकार निर्यात बंदी, साठा बंदी, किमान निर्यात मुल्य वाढविणे,व्यापा-यावर ईनकटॅक्सच्या धाडी, अशा एक ना अनेक अटी घालुन कांदा भाव पाडण्याचे कारस्थानाचे सरकार करत असते. शेतक-याचे कांदा व्यापार स्वातंत्र्य अशा पद्धतीने हिरावून घेतले जाते.या प्रकारच्या शासकीय धोरणामुळे व्यापारी परदेशात केलेल्या कराराची पूर्तता करू शकत नसल्याने आपले परदेशातील गि-हाईक तुटले असून परदेशात आपला कांदा आवडत असताना नाविलाजे ईतर देशांकडून कांदा आयात केला जातो.
सरकार कडुन निर्यात बंद नसल्याचं सांगितले जाते परंतु निर्यात मुल्य किती,परदेशात कांदा जातो किती याचा खुलासा करत नाही.
आज महाराष्ट्रात एकदोन रूपये किलोने कांदा विकला जातो त्या कडे सरकार सोईस्करपणे डोळे झाक करत असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर राजकिय कुरघोडी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र असून शेतक-याला वा-यावर सोडले असल्याचे शेतकरी संघटनेने या पत्रकात सांगितले.
कांदा उत्पादन खर्च किमान रूपये एकहजार पाचशे प्रती क्विंटल एवढा आहे.लहरी हवामान, वाढलेली मजूरी,महागडी खत, औषधे,डिझेल भाव याच्या मुळे कांदा पिक घ्यावा कि नाही अशी परिस्थिती केंद्र सरकारच्या धोरणामुळे निर्मान झाली आहे. शेतक-याला वाचवायचे असेल तर केंद्र सरकारने शेतक-यांना त्यांनी शिकलेल्या कांद्याला प्रती क्विंटल एक हजार रूपये अनुदान द्यावे अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे. तरच कांदा उत्पादक शेतकरी जीवंत राहणार आहे.
कांदा पिका सारखीच परिस्थिती सोयाबीन, कापुस, भाजीपाला पिकविणा-या शेतक-यांची झाली असून कृषी प्रधान देशाचे सरकार सुस्त कसे आहे? असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी संघटना शेतक-यांसोबत तिव्र आंदोलन उभारले असा इशारा देण्यात आला. सदर पत्रक शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे ,बापूसाहेब पगारे, बाळासाहेब गायकवाड, अरूण जाधव, सुभाष सोनवणे, शिवाजी वाघ,आनंदा महाले, जाफरभाई पठाण, विठ्ठल वाळके, अनिस पटेल, सुरेश जेजूरकर यानी प्रसिद्ध केले.