थोर स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपेंना एन्झोकेममध्ये अभिवादन

थोर स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपेंना एन्झोकेममध्ये अभिवादन

येवला-  पुढारी वृत्तसेवा

1857च्या स्वातंत्र्यलढ्याचे सरसेनापती व येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे पुण्यतिथीनिमित्त येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या जन्मस्थळी असलेल्या अर्धाकृती पुतळ्याला संस्थेचे प्रभारी अध्यक्ष रमेशचंद्र पटेल यांनी पुष्पहार अर्पण केला, तर हुतात्मा स्मारक येथील पूर्णाकृती पुतळ्याला विद्यालयाच्या उपप्राचार्या शुभांगी खाखरिया यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यालयात तात्या टोपेंच्या प्रतिमेला पर्यवेक्षक दत्तकुमार उटवाळे, कैलास धनवटे यांनी पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्या शुभांगी खाखरिया यांनी तात्यांच्या जीवनाचे वर्णन केले. 
      विद्यालयाचे पर्यवेक्षक दत्तकुमार उटवाळे यांनी मनोगत व्यक्त करताना तात्यांच्या जन्मभूमीत त्यांचे स्मारक व्हावे याकरिता संस्थेचे प्रभारी अध्यक्ष रमेशचंद्र पटेल यांनी त्या काळात प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नांमुळेच तात्या टोपे यांचे स्मारक आज येवल्यात दिमाखात उभे असल्याचे सांगितले. 
    तसेच तात्या टोपेंच्या 1857च्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान कथन करतानाच देशासाठी बलिदान केलेल्या थोर सेनानींचं स्मरण करणं आपलं आद्यकर्तव्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ शिक्षिका चंपा रणदिवे मॅडम यांनी मनोगतातून तात्या टोपेंना त्यांच्या  जवळच्याच विश्वासू मित्राने विश्वासघात  करून त्यांना पकडून दिले, त्यामुळे मित्रांवर अतिविश्वास ठेवू नये असे सांगितले.
     कार्यक्रमाचे नियोजन व  सूत्रसंचालन विशाल कळमकर यांनी केले तर आभार रामेश्वरी शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश सोनवणे, रमेश माळी, सतिश विसपुते,  यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने