येवला येथे निवडणूक क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
येवला : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा पार्श्वभूमीवर, 20 दिंडोरी लोकसभा मतदार संघाअंतर्गत 119 येवला विधानसभा मतदारसंघांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार आबा महाजन यांच्या उपस्थितीत एन्झोकेम विद्यालयाच्या सभागृहात क्षेत्रीय अधिकारी,मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे निवडणूक कामातील महत्त्व विशद करत क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे कर्तव्य,जबाबदाऱ्या व अधिकार याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना मतदान केंद्राध्यक्षांची तपासणी सूची वाटप करून त्यातील सर्व मुद्देनिहाय चर्चा व मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये मतदानाची वेळ, अभिरूप मतदान, आदर्श मतदान केंद्र, मतदान अधिकाऱ्यांची कामे, इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राची हाताळणी व काळजी, मतदान केंद्रावरील कायदा व सुव्यवस्था,वेब कास्टिंग त्याच बरोबर मतदान केंद्रावरील आवश्यक मूलभूत सुविधा (पिण्याचे पाणी, सावली, दिव्यांग मतदारांसाठी सुविधा, स्वच्छतागृह) या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तहसीलदार आबा महाजन यांनी निवडणूक कामी उपयोगात येणाऱ्या फॉर्म्स व पाकिटाची सविस्तर माहिती सांगितली. तसेच सदर कागदपत्रे मोहोर बंद करून लिफाफे सीलबंद कसे करावे याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
यानंतर मतदान यंत्र तज्ञ प्रशिक्षक दिलीप मगर,विकास सोनवणे यांनी अभिरुप मतदान आणि मतदान यंत्र जोडणी प्रात्यक्षिक दाखवले.
सदर प्रशिक्षणासाठी नायब तहसीलदार नितीन बाहिकर, पंकज मगर, तांत्रिक सहाय्यक निवृत्ती नागरे, सुनील महाजन, तलाठी विशाल डगळे, बीएलओ समन्वयक रवींद्र शेळके, अजय घिगे तसेच येवला विधानसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेसह मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित होते.