शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसाठी सुप्रीम कोर्टात लढाई सुरू! शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळवून देण्याचा विडा मी उचलला! आमदार किशोर दराडेची माहिती : पर्यवेक्षक पैठणकर,देसले,देव्हारे यांच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसाठी सुप्रीम कोर्टात लढाई सुरू!
शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळवून देण्याचा विडा मी उचलला!
आमदार किशोर दराडेची माहिती : पर्यवेक्षक पैठणकर,देसले,देव्हारे यांच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार


येवला : पुढारी वृत्तसेवा
शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळवून देण्याचा विडा मी उचलला आहे. हा निर्णय होत नाही तोपर्यंत मी देखील पेन्शन घेणार नाही,अशी घोषणा सभागृहातच केली आहे.आता शासनाकडे पाठपुरावा सुरू आहेच पण सुप्रीम कोर्टात देखील जुन्या पेन्शनची लढाई सुरू असून तेथून शिक्षकांना न्याय मिळेल असा विश्वास शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केला. 
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेंद्र पैठणकर तसेच नगरसुल विद्यालयातील मराठी विषयाचे प्रा.डी.आर.देसले, चित्रकला विषय शिक्षक जे.के.देव्हारे यांचा सेवापूर्ती सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सहसचिव प्रविण पाटील होते.तर संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा पाटील, बाजार समितीचे माजी सभापती डॉ.सुधीर जाधव,नगरसुल शाळेचे प्राचार्य डी.बी.नागरे, सावरगाव शाळेचे मुख्याध्यापक एम.एम. अलगट,भारम शाळेचे मुख्याध्यापक मच्छीद्र आवारे,तळवाडे शाळेचे मुख्याध्यापक एस.एच. अहिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार दराडे यांच्या हस्ते पर्यवेक्षक श्री.पैठणकर,श्री.देव्हारे यांचा स्तकार करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी प्रवीण पाटील यांचा दराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
शिक्षक हा ज्ञानदानाचे पवित्र काम करत असतो.सेवा काळात घडविलेले विद्यार्थी ही शिक्षकांची आयुष्याची कमाई असते.त्यामुळे सेवानिवृत्त होतांना होणारा गौरव आनंददायक असतो असे श्री.दराडे म्हणाले.मागील सहा वर्षांत शिक्षकांना २०,४० टक्के अनुदान मिळवून देण्यासह वेतनेतर अनुदान,वैद्यकीय बिले,रखडलेले फरक बिले मार्गी लावून शिक्षकांना न्याय मिळवून दिला.शिक्षकांचे अधिकारी स्तरावर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पाचही जिल्ह्यात ३० वर शिक्षक दरबार घेतले.आयुक्त स्तरावर शालार्थ आयडी मिळण्यासाठी उपोषण करून अनेकांचे रखडलेल्या ऑर्डर आणि शालार्थ आयडी घरपोच मिळून देत शिक्षकांना न्याय देण्यासाठी सतत लढल्याचे यावेळी आमदार दराडे म्हणाले.
शिक्षकांची एकजूट महत्वाची असून यामुळेच प्रश्न मार्गी लागतात.आपले प्रश्न सोडविण्यासाठी आमदार दराडे सारखे दमदार काम करणारा हक्काचा शिक्षक आमदार आपल्याला पाहिजे असल्याचे यावेळी संस्थेचे सचिव प्रवीण पाटील म्हणाले.यापूर्वी शिक्षक आमदार कधी माहित होत नसायचे मात्र आमदार दराडे यांनी सहा वर्षात प्रत्येक शाळेला संगणक,बहुपयोगी प्रिंटर,पुस्तके, मायक्रोस्कोप,पथदीप अशा अनेक वस्तू दिल्या. शाळांना भेटी देऊन प्रश्न सोडविल्याने हक्काचा आमदार म्हणून सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत असल्याचे डॉ. जाधव, प्राचार्य नागरे, मुख्याध्यापक आवारे,येवला तालुका माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक वाल्मिक नागरे,नाना लहरे व शैला गवळी आदींनी आपल्या मनोगतातून सांगितले.
यावेळी उपप्राचार्य राजेंद्र नागरे,पर्यवेक्षक मंगेश नागपूरे,अनिल मुंढे,प्रकाश उगलमुगले,गजानन नागरे,बी.टी.मुंगसे,सुधीर चेमटे,मनोज ठोंबरे,सुमेध कुऱ्हाडे,संतोष दाभाडे आदींसह शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो
येवला : सेवानिवृतिनिमित्त पर्यवेक्षक राजेंद्र पैठणकर व जे.के.देव्हारे यांचा सत्कार करतांना आमदार किशोर दराडे,सहसचिव प्रवीण पाटील आदी.
थोडे नवीन जरा जुने