येवला तालुक्यात धक्कादायक घटना; पब्जीच्या व्यसनामुळे तरुणाची आत्महत्या
येवला (प्रतिनिधी): येवला तालुक्यातील देवळाणे गावात एका १८ वर्षीय तरुणाने पब्जी या ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे मानसिक तणावातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
![]() |
Image source Internet |
मृत तरुणाचे नाव यशराज बोर्डे आहे. त्याला पब्जी या ऑनलाइन गेमचे गंभीर व्यसन जडले होते, असे सांगितले जाते. या गेमच्या प्रभावामुळे आणि मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी यशराजने एक भावनिक सुसाइड नोट लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्याने आपली मानसिक अवस्था आणि निराशा व्यक्त केली होती. त्या पत्रात, तो खूपच निराश आणि तणावात असल्याचे लिहिले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पब्जीच्या एका खेळातील अंतिम फेरीमध्ये शेवटचा अंत झाला तर दुसरा जन्म कसा मिळेल, याबद्दल लिहिलेला होता, ज्यामुळे त्याने असा निर्णय घेतला असावा.
घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आला आहे. पालक आणि शिक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.