आता सर्वत्र चालणार डिजिटल सातबारा तलाठ्यांच्या सही, स्टॅम्पची झंझट संपली, फक्त १५ रुपयांत मिळणार सातबारा

 


आता सर्वत्र चालणार डिजिटल सातबारा तलाठ्यांच्या सही, स्टॅम्पची झंझट संपली, फक्त १५ रुपयांत मिळणार सातबारा
---------------------------------------------


येवला : संवाददाता 
शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना घरबसल्या पारदर्शक, जलद आणि कायदेशीर सेवा मिळावी  या उद्देशाने शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला असून नवीन नियमांनुसार, नागरिकांना आता केवळ १५ रुपयांचे शुल्क भरून महाभूमी पोर्टलवरून अधिकृत डिजिटल सातबारा उतारा मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे या डिजिटल उताऱ्यावर तलाठ्याची स्वाक्षरी किंवा शिक्क्याची आवश्यकता राहणार नाही. डिजिटल स्वाक्षरी, क्यूआर कोड आणि १६ अंकी पडताळणी क्रमांकामुळे हे उतारे स्वतःच कायदेशीरदृष्ट्या वैध ठरणार असून सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग व न्यायालयीन व्यवहारात ते अधिकृत मानले जाणार आहे.


अनेक वर्षांपासून नागरिकांना तलाठी किंवा सज्जा कार्यालयात जाऊन वारंवार चकरा मारून सातबारा मिळवावा लागे. काही ठिकाणी अधिकृत उताऱ्यासाठी चिरीमिरी देण्याच्या तक्रारीही समोर येत असत. या नव्या परिपत्रकामुळे या सर्व अडचणींवर पूर्णविराम लागला आहे. संगणकीकृत, डेटाबेस-आधारित आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त हे उतारे आता सर्व प्रकारच्या शासकीय कामांसाठी वैध मानले जात असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी हा महत्वपूर्ण दिलासा ठरणार आहे.


सातबारा, ८-अ व फेरफार काढण्यासाठी शासनाच्याdigitalsatbara.mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यातानंतर तुम्ही डिजिटल पेमेंट करुन उतारे काढू शकता. या डिजिटल स्वाक्षरीवर तलाठ्याची सही किंवा शिक्का याची आवश्यकता नाहीये. डिजिटल स्वाक्षरी, क्यूआर कोड, १६ अंकी पडताळणी क्रमांक असणार आहे त्यामुळे हे डिजिटल सातबारा कायदेशीरदृष्ट्या वैध असणार आहेत.

डिजिटल सातबारा, ८ अ आणि फेरफार कसा डाऊनलोड करायचा?

स्टेप 1 : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या महाभूमीच्या https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. 
स्टेप 2 : ओटीपी बेस्ड लॉगीन पर्याय निवडून मोबाईल क्रमांक नोंदवा, त्यानंतर ओटीपी फोनवर येईल. तो नोंदवून लॉगीन करा.

स्टेप 3: जिल्हा, तालुका, गाव  निवडा. अंकित सातबारा की अक्षरी सातबारा पर्याय निवडा. 

स्टेप 4: सर्वे नंबर किंवा गट क्रमांक शोधा त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडा. पीक पाहणीचा डाटा आवश्यक असल्यास त्याबाबतचा पर्याय निवडा. 

स्टेप 5 :  एका उताऱ्यासाठी आवश्यक असणारी १५ रुपयांच्या रकमेनं ऑनलाईन पेमेंट द्वारे रिचार्ज करा. रिचार्च केल्यानंतर ऑनलाईन सातबारा डाऊनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. हा सातबारा पीडीएफ स्वरुपात असेल. 


---------------------------------------------

शासनाचा हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा, पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा देणारा असून तालुक्यातील शेतकरी व सामान्य नागरिक या निर्णयाचे नक्की स्वागत करेल.

बाबासाहेब गाढवे, प्रांताधिकारी येवला 

---------------------------------------------

यापुढे तलाठ्याच्या सही आणि शिक्क्याची गरज संपली असून डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा व ८-अ तसेच फेरफार उतारे अधिकृत आणि वैध ठरणार आहे.

आबा महाजन, तहसीलदार येवला

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने