येवला पोलिसांची मोठी कारवाई; अवघ्या सहा तासात आंतरराज्यीय चोरट्यांची टोळी गजाआड
येवला (प्रतिनिधी): येवला तालुका पोलिसांनी एका आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला अवघ्या सहा तासांत अटक करून, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ६८ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.
![]() |
जाहिरात |
१८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास येवल्यातील रिलायन्स जिओ टॉवरजवळून महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधून सुमारे १५० किलो वजनाची तांब्याची कॉईल चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तातडीने विशेष पथक नेमले आणि तपासाची चक्रे फिरवली.
तपास सुरू असताना, १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, कासारखेडा शिवारात काही संशयित व्यक्ती फिरत आहेत, ज्यांची भाषाशैली बाहेरील राज्यांतील वाटते. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलिसांचे पथक गोपाळवाडी फाट्याजवळ पोहोचले असता, दोन मोटरसायकलवर चार संशयित व्यक्ती भरधाव वेगाने येवल्याकडे जाताना दिसल्या.
पोलिसांनी पाठलाग करून, त्यांना सावरगाव फाट्याजवळील स्पीडब्रेकरवर मोठ्या शिताफीने पकडले. त्यांच्याकडील गोण्या तपासल्या असता, त्यात चोरीला गेलेला ट्रान्सफॉर्मरचा तांब्याचा कॉईल आणि चोरीसाठी वापरली जाणारी साधने मिळाली. पोलिसांनी एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शंकर रामलाल भिल (वय ४०), रतन कजोड भिल (वय २२), बहिरूलाल वित्तर भिल (वय ३८) आणि पप्पु उर्फ लक्ष्मण गोपाल भिल (वय ३०) अशी आहेत. हे सर्व आरोपी राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी रिमांड मंजूर झाली आहे. पोलिसांनी आरोपींकडून इतर गुन्ह्यांचीही माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
या यशस्वी कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस नाईक सचिन वैरागर, पोलीस शिपाई गणेश सोनवणे, सागर बनकर आणि नितीन पानसरे यांचा समावेश होता. त्यांच्या या कामगिरीचे मालेगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी कौतुक केले आहे. या कामगिरीमुळे येवला तालुक्यातील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.