नगरपालिका-नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज आता ऑनलाईनसह ऑफलाईनही स्वीकारणार; १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
येवला :
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवारांना येत असलेल्या तांत्रिक अडचणींवर राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण उपाययोजना केली आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसांपूर्वी संगणक प्रणालीवर येणारा ताण आणि उमेदवारांना समान संधी मिळावी या उद्देशाने, आयोगाने उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) स्वीकारण्याची प्रक्रिया ऑनलाईन (संकेतस्थळ) आणि पारंपारिक (ऑफलाईन) अशा दोन्ही पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना (मुंबई शहर व उपनगर वगळता) निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत, उमेदवारांना सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. विशेष म्हणजे, या कालावधीत येणाऱ्या रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.


