पारेगाव येथे पडलेली वस्तू 'हवामान मापन यंत्र' घाबरण्याची गरज नाही..
येवला :
येवला तालुक्यातील पारेगाव परिसरात शेतकरी तुळशीराम पाठे यांच्या शेतात आकाशातून एक मोठे हवामान मापन यंत्र खाली कोसळले. शेतात अचानक मोठा आवाज झाल्याने आणि एक अनोखी वस्तू पडल्याचे पाहून शेतकरी पाठे यांनी तातडीने गावकऱ्यांना माहिती दिली.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे आणि नंतर उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले. कोसळलेल्या वस्तूचा आकार मोठा असून, त्यावर विविध इलेक्ट्रॉनिक साधनांसारखी उपकरणे जोडलेली असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे, ज्यामुळे हे उपकरण हवामान अभ्यास करणाऱ्या एखाद्या संस्थेशी संबंधित असावे अशी शक्यता व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस आणि महसूल प्रशासन पारेगावमध्ये दाखल झाले. मंडळ अधिकारी गायके आणि येवला पोलीस यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, हे यंत्र नेमके कुठून आले आणि कोणाचे आहे याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असून, यंत्राची तपासणी तज्ज्ञ पथकाकडून केल्यानंतरच घटनेविषयी अधिकृत माहिती स्पष्ट होईल, असे नमूद केले आहे.
दरम्यान येवला तालुक्यातील हवामान अभ्यासक बंडू नाना शिंदे यांनी सांगितले की " पारेगाव येथे आढळलेले हे उपकरण 'रेडिओसोंड' (Radiosonde) नावाचे प्रगत हवामान मापन यंत्र असण्याची दाट शक्यता आहे. जगभरातील हवामान विभागांकडून वातावरणातील उच्च स्तरावरील अचूक डेटा (जसे की तापमान, दाब आणि वाऱ्याची दिशा) गोळा करण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो. हे यंत्र एका मोठ्या फुग्याला (Weather Balloon) बांधून आकाशात सोडले जाते. सुमारे ३० किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर फुगा फुटतो आणि हे उपकरण पॅराशूटच्या मदतीने हळूवारपणे खाली येते. यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र प्रशासनाने यंत्राची सखोल तपासणी करून ते कोणत्या संस्थेचे आहे हे निश्चित करणे आवश्यक आहे."


