संत चरित्र डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करा!

येवला  - संतांची भूमी म्हणून जगात हिंदुस्थानची ओळख आहे. संतांच्या विचारात शक्ती आणि ताकद आहे. त्यामुळे जगात हिंदुस्थानला महासत्ता बनविण्यासाठी संतांचे चरित्र डोळ्यांसमोर ठेवून वागल्यास आदर्श मानव घडवता येईल, असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी येथे केले.
शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणावर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग आयोजित सत्संग मेळावा व हितगुजाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अण्णासाहेब मोरे यांनी उपस्थित सुमारे साडे पाच हजार सेवेकर्‍यांशी संवाद साधत हितगुज केले. मानवी जीवनातील विविध महत्त्वपूर्ण विषयांना स्पर्श केला. विवाहाविषयी बोलताना कुठलाही अनाठायी खर्च न करता साखरपुड्यातच लग्न करण्याचा सल्लाही मोरे यांनी दिला. अतिगंभीर आजारांवर आयुर्वेदिक तोडगे व उपाय माऊलींनी सांगितले. हिंदुस्थानला महासत्ता बनवायचे असेल तर शैक्षणिक अभ्यास क्रमांमध्ये कायद्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आदर्श पिडी घडवायची असेल तर मुलांवर लहानपणापासून संस्कार करणे गरजेचे आहे. संत, स्वातंत्र्य सैनिक यांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आचरण केल्यास आदर्श नागरिक घडवता येतील, असे अण्णासाहेब मोरे यांनी प्रतिपादन केले.
थोडे नवीन जरा जुने