जगदंबा देवी मंदिरातील दानपेट्या फोडणार्‍याची माहिती देण्याचे आवाहन  येवला तालुक्यातील कोटमगावच्या जगदंबा मंदिरातील चोरीप्रकरणी सीसीटीव्ही कॅमेर्‍याने टिपलेल्या चोरट्याविषयी माहिती देण्याचे आवाहन नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रा.जा. देसाई यांनी केले आहे. येवला - वैजापूर रोडवरील कोटमगावच्या जगदंबा मंदिरात दि. २२ जानेवारी २0१३च्या मध्यरात्री २ ते ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने व त्याच्या साथीदाराने मंदिराच्या पाठीमागील ग्रीलचे गज कापून दानपेट्या फोडून, तसेच जगदंबा मातेच्या तीन मूर्तींवरील चांदीच्या छत्र्या असा एकूण साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी रावसाहेब छबू कोटमे(वय ४६, रा. कोटमगाव) यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक श्रावण सोनवणे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, मंदिरातील क्लोजसर्किट टीव्हीद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये आरोपीची ओळख झाली असून, त्याच्याबाबत माहिती असल्यास पोलिसांना माहिती कळविण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. माहिती देणार्‍यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (0२५३) २३0९७१0 किंवा येवला पोलीस ठाण्याच्या (0२५५९)२६५0१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देसाई यांनी दिली.
थोडे नवीन जरा जुने