अपहरणकर्त्यांच्या तावडीतून विद्यार्थ्याचे शिताफीने पलायन

येवला  - तालुक्यातील उंदीरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणार्‍या सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्याचे सोमवारी गुंडांनी अपहरण केल्यानंतर अपहृत बालक प्रसंगावधानामुळे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटला. अपहृत विद्यार्थी महेश रोहमचे असामान्य धैर्य कौतुकास पात्र ठरले आहे.
महेश राजेंद्र रोहम हा विद्यार्थी उंदिरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवी इयत्तेत शिकतो. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत महेशची शाळा होती. शाळा सुटल्यानंतर ११ वाजता महेश आडगाव शिवारातील कोटमगाव रस्त्यावरील आपल्या मळ्यात गेला. १ वाजेपर्यंत या मळ्यात थांबल्यानंतर पुन्हा उंदिरवाडी गावात सायकलवरून आला. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास कोटमगाव रस्त्यावरच दुसर्‍या मळ्यात घर आहे त्याठिकाणंी जात असताना पाठीमागून स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यास रस्ता विचारला. त्यानंतर किराणा दुकान कुठे आहे असे एक एक प्रश्‍न केले. महेशने पळ काढताच ३ ते ४ अपहरणकर्त्यांनी पाठलाग करीत महेशच्या तोंडावर स्प्रेचा मारा केला व चौघांनी स्कॉर्पिओ गाडीत टाकून वैजापूरकडे पलायन केले. वैजापूरच्या पुढे गेल्यानंतर नागपूर राज्यमहामार्गावर अपहरणकर्त्यांनी चहा पिण्यासाठी गाडी एका हॉटेलवर थांबवली.
.. अन् महेशने धैर्याने पळ काढला
हॉटेलवर चारही अपहरणकर्ते चहा पिण्यात मश्गूल असताना गाडीत बसलेल्या महेशने धैर्याने गाडीचा दरवाजा उघडून हॉटेलकडे पळ काढला. अपहृत बालक महेश तावडीतून सुटल्याचे बघून अपहरणकर्त्यांनीही हॉटेलवर कुठलाही गाजावाजा न करता स्कॉर्पिओ गाडी घेऊन राज्य महामार्गानेच पलायन केले. महेश रोहमने सुमार दोन तासांनंतर वडील राजेंद्र बापू रोहम यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आठवून हॉटेल मालकाला सांगितला.
रात्री ९ वाजता वडिलांची झाली अखेर भेट
रात्री ९ वाजता हॉटेलमालकाने संपर्क साधल्यानंतर अपहृत बालक महेश व वडील राजेंद्र रोहम यांची अखेर भेट झाली. ७ तासांच्या या अपहरणनाट्याची अखेर महेशच्या धैर्यामुळे झाल्याने सवार्र्नीच नि:श्‍वास सोडला. दरम्यान, महेश रोहमचे उंदिरवाडी परिवारात कौतुक केले जात असून अपहरणाच्या घटनेने मात्र ग्रामीण भागात पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
थोडे नवीन जरा जुने