देशमाने शिवारात दुचाकी चालकाची लूट

देशमाने शिवारातील खडकी नाल्यावर बुधवारी (दि. २३) रात्री ९.३0 वाजेच्या सुमारास दुचाकीस्वारांना आडवून डोळ्यात मिरची पूड टाकत सुमारे वीस हजारांची लूट करण्यात आली.

देशमाने येथील श्रावण चंद्रभान बनकर व पंकज विजय वाबळे (वाहेगाव, ता. निफाड) हे रात्री येवल्याहून देशमानेकडे मोटारसायकलने (एमएच १५ डीपी ३६१६) परत येत असताना नाशिक - औरंगाबाद महामार्गावर देशमाने शिवारातील खडकी नाल्यावर पाठीमागून पल्सर मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी गाडी आडवी लावून बनकर व वाबळे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. दरम्यान, लाइट फिटिंगचे काम आटोपून परतणार्‍या बनकर व वाबळे यांच्याकडील रोख ७ हजार रुपये, १0 हजार रुपये किमतीचे हॅमर, हॅँडड्रिल आदींसह साहित्य घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महामार्गावर पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
थोडे नवीन जरा जुने