जागतिक क्षयरोग सप्ताहनिमित्त येवल्यात जनजागृती रॅली

जागतिक क्षयरोग सप्ताहनिमित्त येवल्यात जनजागृती रॅली

येवला - वार्ताहर

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त येवला ग्रामीण रुग्णालयाच्या क्षयरोग पथकाच्या वतीने शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. 
शहरातील नगर- मनमाड राज्य महामार्गावरील ग्रामीण रुग्णालयातुन शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता जनजागृती रॅलीला प्रारंभ करण्यात आला. शहराचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीत एस. एन. डी. नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनींसह स्वामी मुक्तानंद विद्यालय, एन्झोकेम विद्यालय व जनता विद्यालयाचे विद्यार्थी हातात घोषवाक्य लिहिलेले फलक हाती घेऊन सामील झाले होते. 'सर्व जण मिळून क्षयरोग संपुया' या घोषवाक्यासह क्षयरोगाची कारणे लिहिलेले फलक शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते. फत्तेबुरुज नाका, गंगादरवाजा, काळा मारुती रोड, राणा प्रताप चौक, आझाद चौक, टिळक मैदान, सराफ बाजार, मेनरोड, जब्रेश्‍वर खुंट, इंद्रनिल कॉर्नर आदी मार्गावरुन रॅली नेण्यात आली. विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस. डी. सदावर्ते यांनी क्षयरोगावर सविस्तर मार्गदर्शन केले. देशात दररोज ४० हजार व्यक्तिंना क्षयरोगाची लागण होते, ५ हजाराहून अधिक लोकांना क्षयरोग होतो. तर एक हजाराहून अधिक रुग्ण क्षयरोगाने मरण पावतात. क्षयरोग हा आजार पूर्णत: बरा होतो, असे सांगुन डॉ. सदावर्ते यांनी जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या वर्षी 'सर्व जण मिळून क्षयरोग संपुया' हे घोषवाक्य जाहिर केल्याचेही सांगितले. क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी शासनाच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून क्षयरोगाला रोकण्यासाठी सर्व पातळीवरुन प्रयत्न होणे गरजेचे आहे. रुग्ण संपूर्ण कालावधीत औषधोपचार घेत नाही त्यामुळे त्यांच्या सानिध्यात येणार्‍या निरोगी व्यक्तिंनाही क्षयरोगाची लागण होते, असे सांगुन वैद्यकिय अधिक्षक डॉ. डी. पी. नाईकवाडी यांनी शासकिय व काही खासजगी संस्थांमध्ये क्षयरोगावर संपूर्णपणे मोफत औषधोपचार केले जात असल्याचे सांगुन क्षयरुग्णांनी या उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. मायकोबॅक्टेरीयम ट्यूबर क्लोसिस नावाच्या रोग जंतुमुळे क्षयरोग हा आजार होतो. क्षयरोगाचे संशोधन २४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉबर्ट कॉक्स या शास्त्राज्ञांनी केले. म्हणून दरवर्षी हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे डॉ. नाईकवाडी यांनी सांगितले. यावेळी क्षयरोग पथक प्रमुख नितीन पवार, एम. बसवराज, प्रतिक बाम्हणे, अरुण गायकवाड, एस. डी. शेजावळे, रिजवान शेख, महेश कांबळे, प्रसाद कुलकर्णी, भगवान काकड, श्रीमती बच्छाव, श्रीमती गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसाद  कुलकर्णी यांनी केले. 
थोडे नवीन जरा जुने