दोन वर्षांपासून रवंदेकरांना बस सेवेची आशा प्रादेशिक व्यवस्थापकांकडून जिल्हाधिकारी, खासदारांच्या पत्रांनाही केराची टोपली

दोन वर्षांपासून रवंदेकरांना बस सेवेची आशा

प्रादेशिक व्यवस्थापकांकडून जिल्हाधिकारी, खासदारांच्या पत्रांनाही केराची टोपली


 येवला - वार्ताहर
'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य. मात्र, या ब्रीद वाक्यालाच परिवहन महामंडळ आज विसरलेले दिसून येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाल्यानंतरही रवंदेकरांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेची आशा आजही लागुन आहे. जिल्हाधिकारी, उपमहाव्यवस्थापक, खासदार आदींनी बस सेवा सुरु करण्यासंदर्भात राज्यपरिवहन महामंडळाच्या नाशिक येथील प्रादेशिक व्यवस्थापकांना गेल्या दोन वर्षापूर्वी लेखी पत्रव्यवहार करुनही बससेवा सुरु न झाल्याने कोपरगाव तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कारभारी खैरे यांनी आता बेमुदत उपोषणाचा इशारा येवल्याच्या आगार व्यवस्थापकांना दिला आहे. 
येवला व कोपरगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोपरगाव तालुक्यातील रवंदे या गावाला येवला व कोपरगाव आगाराच्या बस सेवा सुरु होत्या. गेल्या दोन वर्षापूर्वी येवला ते रवंदे ही बस सेवा येवला आगाराकडून बंद करण्यात आली. येवला आगारातुन संपूर्ण दिवसभरात सकाळी ८ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ५ वाजता अशा तीन फेर्‍या रवंदे या गावासाठी केल्या जात असे. रवंदे गावातुन महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येवला येथे येतात. सदरची बससेवा परिवहन महामंडळाकडून बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. येवला ते रवंदे बससेवा सुरु व्हावी, यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी २८ ऑक्टोबर २०१४ शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी ७ डिसेंबर २०१४ तर उपमहाव्यवस्थापक यांनी २२ मे २०१४ रोजी नाशिकच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना लेखी पत्र व्यवहार केला आहे. मात्र, वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या पत्रांना केराची टोपली दाखविण्याचा प्रकार नाशिक प्रादेशिक व्यवस्थापकांनी तसेच विभाग नियंत्रकांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, पालकमंत्री, विधानसभा अध्यक्ष, खासदार आदींकडेही वेळोवेळी पाठपुरावा करुनही बस सेवा सुरु होत नसल्याने आता येवला आगारासमोर कोपरगाव तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कारभारी खैरे यांनी लेखी निवेदनाद्वारे बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. निवेदनावर डॉ. दिलीप दवंगे, चंद्रकांत दिवटे, सागर लभडे, संदिप लभडे, शांताराम खकाळे, रविंद्र सातभाई, किसन पवार, रामदास लभडे, राहूल कांबळे, रफिक शेख आदींच्या सह्या आहेत. 
थोडे नवीन जरा जुने