मराठा या एकाच नावाखाली सर्वांनी हेवेदावे विसरुन एकत्र यावे -- पुरुषोत्तम खेडेकर

 

  मराठा या एकाच नावाखाली सर्वांनी हेवेदावे विसरुन एकत्र यावे --  पुरुषोत्तम खेडेकर

 येवला -  प्रतिनिधी
मराठा समाज बहुसंख्येने असून देखील आपआपसातील वादात तो अडकला आहे. पोटजातीतील उच्च-निच्चतेवर फुट पाडण्यात धन्यता मानली जात आहे. मात्र, मराठा या एकाच नावाखाली सर्वांनी हेवेदावे विसरुन एकत्र यावे. तरुणांनी लिहीते व्हावे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.
शहरातील महात्मा फुले नाट्यगृह येथे आयोजित मराठा जनसंवाद दौरा व सहपरिवार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार मारोतराव पवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, जिल्हा बँकेचे माजी व्हा. चेअरमन ऍड. माणिकराव शिंदे होते. यावेळी खेडकर म्हणाले की, मराठा सेवा संघाचे काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पंचसूत्री, पंचदान, ३३ कक्ष, विविध कार्यक्रम, जिजाउ जन्मोत्सव, महामानवांचे संयुक्त जयंती उत्सव असे उपक्रम राबवत आहोत. समाजाच्या हितासाठीच हे सर्व सुरु असून समाजासाठी प्रत्येकाने जे शक्य होईल ते द्यावे, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, प्रचार-प्रसार माध्यमे ही पंचसुत्री आपण आखली असून याच सामाजिक सहभाग असावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी ३३ कक्ष निर्माण केले आहे. समाजाचे हक्काचे सहजपणे प्रदर्शन करता येईल, असे श्रद्धास्थान असावे, यातुन जिजाऊ व शिंदखेडराजा निवडले गेले. या निमित्ताने जिजाऊंचे कार्य, कर्तृत्व व इतिहास अभ्यासता आला. इतिहास व धर्म ग्रंथांची पुनर्मांंडणी हा जगासमोरील गंभीर प्रश्‍न आहे. मात्र, आपल्या सेवा संघाने यातही यशस्वीपणे काम चालु ठेवले आहे. इतिहासातील व धर्मग्रंथातील वादावादी संपल्याशिवाय सामाजिक बंधुता येणार नाही. ही आपली भुमिका सर्वमान्य झाली आहे. नव-नवे युवक, वक्ते, कलावंत, शाहिर, नाटककार, लेखक या विविध नात्याने पुढे येत आहेत. बहुजन समाजाचे सांस्कृतिकरण होत आहे. यात कुणबी मराठा युवकांचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. यातुन रोजगार निर्मितीसह नवे अर्थकारणही अपेक्षीत आहे, असेही खेडकर म्हणाले.
यावेळी ऍड. माणिकराव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन सुनील गायकवाड यांनी तर प्रास्ताविक भागवतराव सोनवणे यांनी केले. मेळाव्यास प्रा. अर्जुन तनपुरे, माधुरी भदाणे, मनोज आखरे, नितीन पाटील, बाळासाहेब कापसे, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, विठ्ठलराव शिंदे, अर्जुन कोकाटे, विष्णूपंत कर्‍हेकर, देविदास जाधव, संजय पवार,  बाळासाहेब गांगुर्डे, संजय सोमासे, अरुण काळे, मनोज रंधे, सुदाम पडवळ, नानासाहेब शिंदे, एकनाथ गायकवाड, प्रविण निकम, विकास ठोंबरे, विकास साताळकर, पांडुरंग शेळके आदींसह समाजबांधव उपस्थित होते.  आभार संजय पवार यांनी मानले.थोडे नवीन जरा जुने