आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मांजरपाडा प्रकल्प रखडला ना. फडणवीस, ना. महाजनांच्या मार्फत पूर्णत्वाला नेऊ : डमाळे




आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मांजरपाडा प्रकल्प रखडला

ना. फडणवीस, ना. महाजनांच्या मार्फत पूर्णत्वाला नेऊ : डमाळे

 येवला | दि. २७ प्रतिनिधी
येवला तालुक्याला वरदान ठरणारा मांजरपाडा प्रकल्प कधीच पुर्णत्वाला गेला असता मात्र, आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये ३० जून २०१२ पासून हा प्रकल्प तृतीय प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे ६ वर्ष बंद पडला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी १० नोव्हेंबर २०१७ रोजी तृतीय प्रशासकीय मान्यता देऊन उर्ध्व गोदावरी प्रकल्पास ९१७ कोटी ७४ लाख रुपयास मान्यता दिल्यामुळे हा प्रकल्प प्रगती पथावर आहे. त्यामुळे आपल्या सरकारचे पापाचे ओझे दुसर्‍या कोणावर लादू नये, असे भाजपा नेते बाबा डमाळे यांनी या प्रकल्पाबाबत भुमिका स्पष्ट केली आहे.
मांजरपाडा प्रकल्प नंबर १ हा दिंडोरी, वणी, चांदवड, येवला तर काही निफाड व वैजापूरला शेती व  पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पाचा १ किलोमीटर अंतराचा बोगदा पूर्ण झाला आहे. तर दुसरा ९ किलोमीटर अंतराचा बोगदा हा ११३ मिटर तर दुसर्‍या २१२ मिटर असा एकूण ३०० मिटरचे काम पावसा अभावी बंद आहे. तर धरणाच्या भिंतीचे काही काम अपूर्ण आहे. जर २०१२ साली तत्कालीन सरकारने तृतीय प्रशासकीय मान्यता देऊन निधीची तरतुद केली असती तर आज पर्यंत सर्वत्र पाणी पोहचले असते. परंतु जनतेला झुलत ठेऊन त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या प्रकल्पावर दुर्लक्ष केले नसते तर मोर्चा काढण्याची व  मरण यातनाची भाषा करण्याची वेळ आली नसती, असे डमाळे म्हणाले.
मांजरपाड्याचे पाणी उनंदा नदीमधून पुणेगाव धरणात येते. तेथून दोन प्रवाह आहे. दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण भरल्यानंतर पुणेगाव ओव्हरफ्लो झाल्यावर चांदवड तालुक्यातील दरसवाडी धरणातुन येवल्याकडे पाणी येणार आहे.  आज ओझरखेड ओव्हरफ्लो आहे तर पुणेगाव धरणात ८५ टक्के पाणी आहे. मात्र, दरसवाडी धरणात आजमितीला मृत साठा पाणी देखील नाही. त्यामुळे पुणेगाव-दरसवाडीतुन येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत पोहच पाणी आता शक्य होणार नसून कालव्यातील मशिनद्वारे साफसफाई करण्याचे दाखवून लवकरच जलपुजन करण्याचा जो अटापिटा  चाललेला आहे. हा केवळ फार्स आहे. जो पर्यंत पुणेगाव-दरसवाडी ते डोंगरगाव पर्यंत कॅनॉलचे ८७.५ कि. मी. चे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरण करुन पाणी गळती थांबवली जात नाही, कॅनॉलचा चढ- उतार आहे, त्याचे बेड लेव्हलचे काम होणे गरचेचे आहे. किलोमिटर २५ ते ६३ दरम्यान वरील पाईप मोर्‍यावरील स्लॅब होत नाही व त्याची गळती बंद होत नाही. तो पर्यंत डोंगरगाव पर्यंत पाणी येणे मुश्किल आहे. त्याचप्रमाणे पुणेगाव पासून मुरमात माती दबाई केली नसल्यामुळे पाण्याची गळती होते. साखळी क्र. ३२/२०० चे कालव्याचे कालव्याचे तळतलंक काम पूर्ण झाल्याचे दर्शवुन ठेकेदाराची देयके देण्यात आलेली आहेत. सन २००८ मध्ये द्वितीय प्रशासकीय मान्यता मध्ये किलो मिटर १ ते २५ चे कालव्याचे हे रुंदीकरण हे २२० क्युसेसची वहन क्षमतेची मंजुरी असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या सर्व कालव्याच्या त्रृटींचा विचार करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्फत आपण जनतेला बरोबर घेऊन हा प्रकल्प मार्गी लावणार असून आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी कोणीही भाजपा सरकारला विनाकारण दोष देऊ नये. उर्वरीत काम दसरा-दिवाळी मध्ये सुरु होईल, अशी अपेक्षा आहे, असे शेवटी डमाळे म्हणाले. डमाळे यांनी नुकतीच शिष्टमंडळाला बरोबर घेत मांजरपाडा प्रकल्पाची संपूर्ण पहाणी  करत पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याचीही पहाणी करुन संपूर्ण माहिती पत्रकारांना दिली.
------------------------

फोटो ओळी अनुक्रमे-
१) कोरडेठाक दरसवाडी धरण
२) मांजरपाडा प्रकल्प कार्यालयात (साईट) माहिती घेतांना
३) पुणेगाव धरणातील पाणी साठा पहाणी करतांना.
४) पुणेगाव धरणातील पाणी साठा पहाणी करतांना.
५) मांजरपाडा क्र. १ ची मुख्य भिंत
६) मांजरपाडा क्र. १ ची मुख्य भिंत
७) मांजरपाडा क्र. १ ची मुख्य भिंत


थोडे नवीन जरा जुने