कुसूर व अंगुलगाव विद्युत उपकेंद्राचे काम मार्गी उर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आदेश; संभाजी पवार यांच्या पाठपुराव्यास यशकुसूर व अंगुलगाव विद्युत उपकेंद्राचे काम मार्गी
उर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आदेश; संभाजी पवार यांच्या पाठपुराव्यास यश
 येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील कुसूर व अंगुलगाव येथील महावितरण विद्युत उपकेंद्र कार्यान्वित होण्यासाठी वारंवार पाठपुरावा सुरु होता. या कामासाठी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून कुसूर व अंगुलगाव विद्युत उपकेंद्राची निकड त्यांच्या लक्षात आणुन दिल्याने ना. बावनकुळे यांनी तातडीने या दोनही उपकेंद्र कार्यरत करण्याबाबत संबंधितांना आदेशित केल्याची माहिती शिवसेनेचे नेते संभाजीराजे पवार यांनी दिली.
कुसूर व अंगुलगाव परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणे, कमी दाबाने विद्युत पुरवठा असणे, या बरोबरच इतर अनेक तक्रारी या परिसरातील शेतकर्‍यांच्या होत्या. या परिसरात अखंड विजपुरवठा होत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नव्हते. कमी दाबाने विज पुरवठा झाल्यास विद्युत पंप निकामी होण्याचे प्रमाणही अधिक होते. दिवसभर विजपुरवठा खंडीत राहण्याचे अधिक असल्याने शेतकर्‍यांना रात्रीचा दिवस करुन पिके जगवण्यासाठी धडपड करावी लागत होती. या परिसरातील शेतकर्‍यांनी शिवसेना नेते संभाजी पवार यांची भेट घेऊन स्वतंत्र विद्युत उपकेंद्राची मागणी केली होती. पवार यांनी या मागणीची दखल घेत विद्युत उपकेंद्रा संबंधीची सर्व प्रस्ताव  संबंधित विभागाकडे दाखल केले होते. उर्जामंत्री बावनकुळे यांनी या उपकेंद्रांना मंजुरीही दिली होती. परंतु या उपकेंद्रांचे काम सुरु झालेले नव्हते.
आमदार किशोर दराडे, शिवसेना तालुकाध्यक्ष रतन बोरनारे, पुंडलिक पाचपुते, बाजार समिती संचालक कांतीलाल साळवे, पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप मेंगाळ, चंद्रकांत शिंदे, कैलास खोडके आदींसह पवार यांनी उर्जामंत्री बावनकुळे यांची मुंबई येथे भेट घेवून विद्युत उपकेंद्राची निकड विषद केली. या मागणीची दखल घेत ना. बावनकुळे यांनी संबंधित अधिकारी शाबु यांना भ्रमणध्वनीवरुन कुसूर व अंगुलगाव येथील उपकेद्रांचे काम तातडीने सुरु करण्याचे आदेश दिले असल्याचे पवार यांनी सांगितले.

काम मार्गी लागल्याने शेतकर्‍यांना दिलासा
कुसूर व अंगुलगाव या परिसराला नगरसूल येथील विद्युत उपकेंद्रातुन पुरवठा सुरु होता. मात्र, वारंवारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची स्वतंत्र उपकेंद्राची मागणी होती. यासाठी आपण पाठपुरावा केल्याने उपकेंद्राचे काम जलद गतीने होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.
- संभाजी पवार, येवला

थोडे नवीन जरा जुने