अंकाई टंकाई किल्ल्यावर बिजारोपण.
सावली समाजसेवी संस्थेचा उपक्रम.
येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात असणाऱ्या शंभू महादेव डोंगररांगापैकी एका अंकाई टंकाई किल्ल्यावर सावली समाजसेवी बहुद्देशीय संस्था पाटोदा तर्फे बीजारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर अभियानात जवळपास 30 हजारहून अधिक बिया झुडपी पेरणी पद्धतीने झुडपाच्या बुडाजवळ, तसेच मोठ्या दगडांच्या आडोशाला कुदळी व खुरपीने छोटे खड्डे करून टाकण्यात आल्या. ज्या मुळे गुरे चराई होत असताना गुरांचे पाय पडून झाडांचे कोंब मोडणार नाहीत व झाडे मोठे होतील. सदर बिजारोपण अभियानात बनकर पाटील पब्लिक स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. तसेच नेहरू युवा केंद्र नाशिक यांनीही सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना येवला ते अंकाई टंकाई प्रवास करण्यासाठी बनकर पाटील शैक्षणिक संकुल तर्फे संचालक प्रवीण बनकर यांनी बस उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच बिजारोपणानंतर विद्यार्थ्यांसाठी सावली संस्थेतर्फे अल्पोपआहाराचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी बनकर पाटील पब्लिक स्कूलचे प्राचार्य पंकज निकम, उपप्राचार्य दीपक देशमुख, सावली संस्थेचे सचिव महेश शेटे, पंकज मढवई, मच्छिंद्र काळे, नेहरू युवा केंद्राच्या युवा राष्ट्रीय स्वयंसेविका रूपाली निकम, रवींद्र बिडवे आदींनी परिश्रम घेतले.