फ्रावशी शाळेला नमवत संतोष विद्यालयाचा फुटबॉलचा संघ विभास्तरावर
नाशिक येथे जिल्हास्तरावर विजय, सांघिक व वैयक्तिक खेळातही विद्यार्थ्यांची बाजी
येवला : पुढारी वृत्तसेवा
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नाशिकद्वारा आयोजित जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धत नाशिकच्या फ्रावशी शाळेला नमवत बाभूळगाव येथील संतोष विद्यालय व ज्यू.कॉलेजच्या फुटबॉलचा संघाची विभास्तरावर निवड झाली आहे.
नाशिक येथे पोलीस अकादमी येथे जिल्ह्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. जिल्ह्यातील एकूण नऊ महाविद्यालयाचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.साखळी सामन्यात बाजी मारत अंतिम सामना नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल नासिक व बाभुळगावच्या संतोष श्रमिक जुनियर कॉलेज यामध्ये झाला.अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला,त्यामध्ये संतोष श्रमिकच्या खेळाडूंनी फ्रावसी इंटरनॅशनल स्कूलच्या संघाचा दोन गोलने पराभव केला.ग्रामीण भागातील खेळाडूंनी कायम क्लब जॉईंट केलेल्या खेळाडूंचा देखील मोठ्या फरकाने पराभव केला.सदर स्पर्धेसाठी पोलीस अकादमीचे प्रशिक्षक तुषार गवळी,हेमंत गरुड व सर्व प्रशिक्षक यांनी खेळाडूंचे भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.मैदानी हर्डल्स अडथळा शर्यत स्पर्धेत देखील विद्यालयातील १४ वर्षे वयोगटातील ओम किरण तनपुरे या खेळाडूंनी देखील जिल्ह्यात चमकदार कामगिरी करत आपला विजयाचा झेंडा विभागीय स्पर्धेवर रोवला.यशस्वी सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सागर मुटेकर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे,शिक्षक आमदार किशोर दराडे,सेक्रेटरी लक्ष्मण दराडे,कार्यकारी संचालक रुपेश दराडे,प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे,सुनील पवार, प्राचार्य गोरख येवले,उपप्राचार्य आप्पासाहेब कदम आदींनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
● जिल्हास्तरावर झाली निवड
येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये महाविद्यालयातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विजय मिळवल्याने जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रामुख्याने मैदानी स्पर्धेमध्ये शाळा- कॉलेजच्या १४ वर्षे,१७ वर्षे आणि १९ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.त्यामध्ये १४ वर्षे वयोगटात ओम तनपुरे या खेळाडूने १०० मीटर धावणे,लांब उडी,हर्डल्स या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यासाठी पात्र ठरला.तेजस माने ६०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.सांघिक क्रीडा प्रकारात ४-१०० रिलेमध्ये हर्षल हारपडे, तेजस माने,साहिल जेजुरकर,ओम शेळके,प्रशांत आहेर,ओम वाकचौरे या खेळाडूंनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.१७ वर्षे वयोगटांमध्ये देखील विनीत निर्भवणे १५०० मीटरमध्ये प्रथम, वैभव पठारे ३ हजार मीटरमध्ये प्रथम, अनिल निर्भवणे,अभिजीत दाभाडे या खेळाडूंनी देखील तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.१९ वर्षे वयोगटात रोहित कदम २०० मीटर व पाचशे मीटर धावणेमध्ये प्रथम सचिन वैराळ,चेतन बोसारे तर पंधराशे मीटरमध्ये प्रथम जितेंद्र भोई,भालाफेकमध्ये प्रथम रोहित कदम,५ हजार मीटरमध्ये प्रथम प्रथमेश कदम आला.सांघिक रेल्वे प्रकारांमध्ये देखील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये देखील कॉलेजच्या खेळाडूंनी तालुक्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी करत फुटबॉल या क्रीडा प्रकारात अतिशय चुरशीचा सामना गणाधीश कॉलेज व संतोष श्रमिक यामध्ये झाला.महाविद्यालयातील खेळाडूंनी अगदी पहिल्या हाल्फमध्येच चार गोलने गणाधीश कॉलेजचा पराभव केला.खो-खो या क्रीडा प्रकारात देखील अतिशय चुरशीच्या सामन्यात संतोष श्रमिक माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत आपला विजय निश्चित केला.कुस्तीमध्ये विवेक राग या खेळाडूची चमकदार कामगिरी करत जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली तसेच बुद्धिबळ या स्पर्धेसाठी देखील गौरव गांगोडे,जयेश वाघ या दोन खेळाडूंची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यशस्वी सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक सागर मुटेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे,शिक्षक आमदार किशोर दराडे, संचालक रुपेश दराडे आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
येवला : नाशिक येथे जिल्हास्तरीय स्पर्धेत
विजयी झालेला संतोष विद्यालयाचा फुटबॉलचा संघ दुसऱ्या छायाचित्रात जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना आमदार नरेंद्र दराडे.