कोटमगावी राष्ट्रवादी ला धक्का
तालुक्यात राष्ट्रवादीसह शिवसेनेचा दावा!
येवला - पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निकालाने धक्कादायक कौल दिला आहे.कोटमगाव बुद्रुक येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षचा पराभव झाल्याने याची जोरदार चर्चा झाली. तालुक्यात ठाकरे गटाला तीन,राष्ट्रवादीला दोन तर अपक्षांना दोन ग्रामपंचायतीचे सरपंचपद मिळाले आहे. राष्ट्रवादी व ठाकरे गटाने बहुतांशी ग्रामपंचायतीवर आमचीच सत्ता आल्याचा दावा केला आहे.
येथील ग्रामपंचायतीचा कौल तहसील कार्यालयातील मतमोजणीतून मिळाला. अवघ्या दोन तासात सर्व अंदाज आल्यानंतर विजेत्यांनी तहसील कार्यालय बाहेर जल्लोष केला तर पराभूतांनी मात्र काढता पाय घेतला.आजच्या निकालाने अनेक प्रस्थापितांना धक्का दिला असून नैवेदित चेहऱ्यांना ग्रामपंचायतीची सत्ता मिळवून दिली आहे.
शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांचे कट्टर समर्थक युवा नेते कांतीलाल साळवे व पंचायत समितीच्या माजी सभापती आशा साळवे यांचे पुतणे प्रणव साळवे यांनी चांदगाव ग्रामपंचायतीत एकतर्फी विजय मिळविला आहे तर कांतीलाल साळवे यांचे चुलत बंधू सुनील साळवे यांनी नायगव्हाण ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारल्याने लगतच्या दोन्ही ग्रामपंचायत साळवे कुटुंबीयांच्या ताब्यात आल्या आहेत.कुसुर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संभाजी पवारांचे समर्थक माजी सभापती दिलीप मेंगाळ यांच्या गटाच्या सुरेखा गायकवाड यांची यापूर्वीच बिनविरोध झाली असून या तीनही ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाची सत्ता आली.राष्ट्रवादीसाठी कोटमगाव बुद्रुक येथील निकाल धक्कादायक मानला जात आहे. येथे राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष सोनाली कोटमे यांचा तब्बल ५६० मतांनी पराभव झाला आहे.या निकालाची तालुक्यात जोरदार चर्चा झाली.आडगाव चोथवा येथे रामकृष्ण खोकले यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.मात्र खोकले यांनी कुठल्याही पक्षाचे बॅनर लावण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
चांदगावला थेट सरपंचपदी प्रणव साळवे (४७२) अडीचशेहून अधिक मताधिक्याने विजयी झाले.तर सदस्यपदी छाया गोराणे,संगीता साळवे,प्रदीप अहिरे,रवींद्र गोराणे,सुनीता गोराणे हे विजयी झाले.
नायगव्हाण येथे थेट सरपंचपदी सुनील साळवे ४८७ मते घेऊन विजयी झाले. सदस्यपदी निलेश जोरवर,संतोष सदगीर, नितेश सदगीर,कोमल पानपाटील यांनी विजश्री खेचली.
कुसूर येथे सुरेखा गायकवाड या थेट सरपंचपदी बिनविरोध निवडल्या तर सात जागा बिनविरोध झाल्या होत्या.निवडणूक झालेल्या जागेवर दीपक गायकवाड,लता गायकवाड यांनी विजय मिळविला आहे.
कोटमगाव बुद्रुक येथे बिनविरोधच्या चर्चेनंतर येथे निवडणुकीचा आखाडा रंगला होता.नवोदित चेहरा असलेले राजेंद्र काकळीज विरुद्ध राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सोनाली कोटमे यांच्यात सरळ लढत झाली.मात्र तब्बल ६६७ मते घेऊन श्री काकळीज यांनी सौ. कोटमे (१०६) यांचा मोठा पराभव केला. सदस्यपदासाठी शारदा बिलवरे,सविता वाघमोडे,सचिन ढमाले,मीना माळी, भागवत कोटमे,मंगला पाटील यांनी विजय मिळविला.
आडगाव चोथवा येथे अटीतटीच्या लढतीत रामकृष्ण खोकले (८०८) यांनी शरद शिंदे (५७४) यांचा सरळ लढतीत मोठा पराभव करून थेट सरपंचपद मिळविले.सदस्यपदी शिवाजी खोकले, मंगल घोडेराव,अर्चना खोकले,मेघा आहेर,सुनिता पवार,कचरू खोकले, दिलीप पवार,कांताबाई आहेर यांनी विजय मिळविला.
एरंडगाव खुर्दला आरती उराडे (३५२) व योगिता खापरे (३६८) यांच्यात अतिशय चुरशीचा सामना झाला.यात योगिता खापरे यांनी विजय मिळवला.
येथे सदस्य पदी अतुल पडोळ,रेणुका पाटील,भास्कर पडोळ हे विजयी झाले तर इतर सहा जण बिनविरोध निवडले आहेत.
नांदेसर येथे सुनीता जाधव (४२५) यांनी शीला वाघ (१८९) यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला तर येथे सदस्यपदी लंका कापसे,हिना शेख, विलास मोरे,जायदा शेख,रेखा आहेर यांनी विजय मिळविला.आजच्या निकालानंतर भाजपा राष्ट्रवादीसह शिवसेना ठाकरे गटाने विविध सरपंचपदावर दावे केले.विशेष म्हणजे कुठल्याही सरपंचाने पुढे येऊन माध्यमांसमोर आम्ही कुठल्या पक्षाचे हे जाहीर केलेले नाही.कोटमगाव बुद्रुक येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सोनाली कोटमे यांचा पराभव झाला तर विजयी झालेले श्री.काकळीज यांचा येथील राजकारणाशी कुठलाही संबंध नसून ते नाशिक येथे व्यावसायिक आहेत. असे असताना राष्ट्रवादीचा पराभव होऊनही राष्ट्रवादीच्या वतीने येथे राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.