पंडीत दिनदयाल अंत्योदय योजनेचा येवला तहसिल कार्यालयात शुभारंभ


 पंडीत दिनदयाल अंत्योदय योजनेचा येवला तहसिल कार्यालयात शुभारंभ



येवला  : प्रतिनिधी
 अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक यांचे आदेशानुसार पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेचा येवला तहसिल कार्यालयात ता. १५ रोजी शुभारंभ करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्षस्थानी 
तहसिलदार रोहिदास वारुळे हे उपस्थित होते. 

शुभारंभ प्रसंगी तहसिलदार वारुळे यांनी सांगितले की,  पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेचा विशेष मोहिम कालावधी हा दिनांक १५ जुलै ते १४ ऑगस्ट असुन सदर कालावधीत सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना देण्यात आलेल्या इष्टांकानुसार पात्र लाभार्थ्यांनी फॉर्म जमा करण्याचे आवाहन केले. ता. १४ पावेतो जमा झालेल्या पात्र लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देऊन धान्य पुरवठा करणेत बाबत स्वस्त धान्य दुकानदारांना निर्देश देण्यात आले. तसेच प्रदुषन मुक्त महाराष्ट्र करणेसाठी स्वस्त धान्य दुकानदार यांनी  सदर योजनेतील सर्व लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन घेणेकामी प्रोत्साहित करावे. त्यानुसार गॅस वितरण कंपनीने सर्व पात्र लाभार्थ्यांना गॅस  कनेक्शन वितरीत करण्यात यावेत. सर्व गॅस कंपनीला सदर लाभार्थ्यांना गॅस जोडणी पुरविणे बंधनकारक असून गॅस कंपनीने दररोज दिलेल्या गॅस जोडण्यांचा अहवाल रोजच्या रोज तहसिल कार्यालयास सादर करण्याच्या सुचना गॅस एजन्सीच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या.  

यावेळी पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेचे पात्र लाभार्थी  अमित भावसार, विजय परदेशी, शेख नसरीन शफीक, असलम अब्दुल अजीम शेख, शेख हारुण शेख हुसेन या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका तहसिलदार वारुळे,नायब तहसिलदार राजेंद्र राऊत, रमेश अन्नदाते, प्रकाश बुरंगुले यांचे हस्ते शिधापत्रिका वितरीत करणेत आल्या.  कार्यक्रमाचे नियोजन व उपस्थितांचे आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे यांनी केले. यावेळी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार, किरकोळ केरोसीन परवाना धारक, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने