बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सव संपन्न ....

बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सव संपन्न ....
येवला : पुढारी वृत्तसेवा

 कॅम्पस फेस्टिवल २०२३ अंतर्गत ' ज्युनिअर ऑलिम्पिक सत्र- ४' या शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन अंगणगाव येथील बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन क्रीडाक्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व जनता कला व वाणिज्य महाविद्यालाचे माजी क्रीडा प्रशिक्षक प्रा. शिरीष नांदुर्डीकर व टेनिस खेळाडू तथा क्रीडा शिक्षक किरण कुलकर्णी यांच्या हस्ते,  संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बनकर  व प्राचार्य पंकज निकम यांच्या उपस्थितीत सरस्वतीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करत व क्रीडा स्पर्धेची मशाल प्रज्वलित करून करण्यात आले.
क्रीडा प्रशिक्षक शिरीष नांदुर्डीकर व क्रीडा शिक्षक किरण कुलकर्णी हे क्रीडा क्षेत्रातील गुरु व शिष्य असून ते प्रामाणिक प्रयत्नांमुळे कसे एकाच मंचावर येऊ शकतात या विषयी माहिती देत शाळेचे क्रीडा संचालक दिपक देशमुख यांनी पाहुण्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी अतिथी किरण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना खेळातील यश-अपयशाला संयमाने सामोरे जात पुढे खेळत राहण्याची प्रेरणा दिली. तसेच खेळामुळे जीवनाला कलाटणी मिळते व प्रत्येक प्रामाणिक खेळाडू जीवनात यशस्वी ठरतो असे सांगितले. यावेळी इयत्ता आठवीतील अदिती पायमोडे हिने खेळातील नियम व खिलाडूवृत्ती संदर्भातील 'ऑलिम्पिक शपथ' सर्व विद्यार्थ्यांना दिली.
या क्रीडा स्पर्धांसाठी शाळेचे रायगड, पन्हाळगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग असे चार संघ बनवत प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाची संधी देण्यात आली आहे. यामध्ये कब्बडी, हँडबॉल, लंगडी, क्रिकेट इत्यादी सांघिक तसेच अन्य अॅथेलॅटिक्स क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी धावणे, कार्डबोर्ड शर्यत, अडथळा शर्यत इत्यादी मजेशीर खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रुपाली चव्हाण यांनी आभारप्रदर्शन योगिता शिंदे यांनी केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने