गिरणी मालक व कामगारांच्या समस्या बाबत बैठक मागण्यांसाठी वीज वितरण कंपनी व शासनाकडे पाठपुरावा करणार



गिरणी मालक व कामगारांच्या समस्या बाबत बैठक

मागण्यांसाठी वीज वितरण कंपनी व शासनाकडे पाठपुरावा करणार

येवला : पुढारी वृत्तसेवा

निरंकार सेवा पीठ, मसाला, भात, गिरणी मालक व कामगार महासंघ महाराष्ट्र, शाखा येवलाच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत वीज वितरण कंपनी व शासनाकडे सादर केलेल्या मागण्या साठी पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

वीज वितरण कंपनी कडे संघटीत पीठ मसाला गिरणी मालक व कामगारांना विजेची बिले मराठीतून मिळावी, वापरलेल्या युनिट दरापेक्षा जादा इतर आकार लावू नये उदा. स्थिर आकार, इंधन अधिभार वहन आकार वगैरे, वीजबीले देय तारखेच्या कमीत कमी चार दिवस अगोदर मिळावीत, घरघंटी (मिनी गिरणी) बाहेरील दळण दळून व्यवसाय करीत असतील तर त्यांना व्यावसायिक पध्दतीने विज दर आकारावे, पीठ गिरणीची विज बिलाची औद्योगीक बिलानुसार आकारणी केली जात असल्याने इतर उदयोगाप्रमाणेच २४ तास विज पुरवठा व्हावा, पीठ मसाला गिरणी विज ग्राहकांच्या कामगारांच्या कुटुंबास विमा संरक्षण मिळावे, अनामत रकमेवर बँक नियमाप्रमाणे व्याज मिळावे, विज मंडळाकडून मागण्या मान्य न झाल्यास तालुक्यातील सर्व गिरणी मालक गिरणीचे विज जोडण्या रद्द करण्याचा निर्णय घेणार असल्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. तसेच शासनाकडे गिरणी शेती पूरक गृह उद्योगात घेऊन अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे, मुलांना कॉलेज पर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे, वय वर्ष ५० नंतर मानधन योजना राबवावी, संघटित पीठ, मसाला, भात गिरणी कामगारांसाठी आर्थिक महामंडळाची नियुक्ती करावी. आदी मागण्यांचे सतत पाठपुरावा करण्याचा निर्धार केला. यावेळी शाम कालंगे, अशोक गायकवाड, मच्छिंद्र भागवत, अनवर शेख चंद्रकांत नागपूरे, अनिल वाकचौरे, रमेश कदम, राहूल भावसार आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने