मेळाच्या बंधाऱ्याच्या परवानगीसाठी नागपूरच्या वनविभागाला साकडे!

मेळाच्या बंधाऱ्याच्या परवानगीसाठी नागपूरच्या वनविभागाला साकडे!
ममदापूरच्या ग्रामस्थांचे शिष्टमंडळाने नागपूरला अधिकाऱ्यांची घेतली भेट,स्टेज दोनची परवानगीची मागणी


येवला : पुढारी वृत्तसेवा

अवर्षणप्रवण पूर्व भागातील ममदापूरसह परिसरातील गावांना दिलासा देणाऱ्या मेळाच्या साठवण तलावाच्या कामाला गती मिळावी यासाठी ममदापूर येथील शिष्टमंडळाने नागपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात जाऊन विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली.यावेळी स्टेज दोनच्या स्तरावरील परवानगीला चालना देण्याचे आश्वासन वनविभागाचे विभागीय अधिकारी श्री.दयानंद यांनी शिष्टमंडळाला दिले.
ममदापूर येथील वनहद्दीत असलेल्या मेळाव्याच्या साठवन बंधाऱ्याचा प्रश्न गेल्या ४० ते ५० वर्षापासून प्रलंबित आहे।हा बंधारा रखडून असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या नशिबी दुष्काळ पाचवीलाच पूजलेला आहे.या साठवण तलावाचे काम झाल्यास दुष्काळी असलेला हा भाग काही प्रमाणात बागायती होणार असून शेतीसह वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे.यासाठी वन विभागाची परवानगी रखडली असल्याने व याची फाईल नागपूर येथील इंट्रीग्रेटेड रिजनल ऑफिसकडे प्रलंबित असल्याने या शिष्टमंडळाने नागपूर येथे जाऊन रिजनल कार्यालयातील अधिकारी श्री.दयानंद यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली.
या भागातील पाच ते सात गांवातील दुष्काळीपण थांबवण्यासाठी हा बंधारा अतिशय महत्त्वाचा असल्याने त्याच्या परवानगीला चालना द्यावी अशी विनंती शिष्टमंडळाने केली.मात्र नागपूर कार्यालयात फाईलच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यावर संदर्भातला प्रस्ताव पोर्टलवर ऑनलाईन पाठविण्याच्या सूचना श्री.दयानंद यांनी केल्या. यावर कृती समितीचे मार्गदर्शक कुणाल दराडे यांनी तात्काळ नाशिक येथील वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून पोर्टलवर फाईल पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी पोर्टलवर मंत्रालय तसेच नागपूर कार्यालयात स्टेज दोनच्या परवानगीचा प्रस्ताव सादर झाला.त्यानंतर श्री.दयानंद यांनी हा प्रस्ताव पाहून लवकरात लवकरच स्टेज दोनची परवानगी देण्याचे आश्वासन दिले. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून  शेतकरी व वन्यप्राण्यांच्या हितासाठी या तलावाच्या कामाला चालना द्यावी अशी मागणीही यावेळी केली.या शिष्टमंडळात कृती समितीचे मार्गदर्शक कुणाल दराडे,अध्यक्ष दत्तात्रय वैद्य,सल्लागार दत्तात्रय वाघ, आप्पासाहेब वाघ,भिकाजी गुडगे,प्रकाश गोराणे,घमा गुडघे,बाळासाहेब मते,रमेश जानराव आदी शेतकरी सहभागी होते.

"पूर्व भागात दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे.त्यामुळे मेळ्याचा बंधाऱ्यासह रखडलेले बंधारे होणे गरजेचे आहे.शेतकरी हित साधले जाणार असल्याने आम्ही नागपूर कार्यालयात भेट देऊन परवानगीचा आग्रह केला.याला अधिकाऱ्यांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला असून काम मार्गी लागेपर्यंत ठोस पाठपुरावा  करत राहु."
-कुणाल दराडे,मार्गदर्शक,मेळाचा बंधारा कृती समिती.
फोटो 
नागपूर : मेळाच्या बंधाऱ्यासाठी नागपूर येथे वन विभागाच्या कार्यालयात गेलेले शेतकरी.
थोडे नवीन जरा जुने