येवल्यात 131 ज्येष्ठ,दिव्यांग मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

येवल्यात 131 ज्येष्ठ,दिव्यांग मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

येवला : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकीत प्रथमच 85 वर्षावरील जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांना  टपाली मतपत्रिकेद्वारे गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
त्या अन्वये 20,दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 119,येवला विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाच्या दोन दिवसात 131 मतदारांनी गृह मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या वृद्ध,ज्येष्ठ मतदार तसेच दिव्यांग मतदार यासाठी टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या अन्वये 119,येवला विधानसभा मतदारसंघात दिनांक 10 मे व 11 मे रोजी 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. या अंतर्गत गृह मतदान कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, पोलीस कर्मचारी व शिपाई यांचा समावेश असणाऱ्या चार पथकांची नेमणूक गृह मतदानासाठी करण्यात आली होती.
 या अंतर्गत येवला विधानसभा मतदारसंघात 13 दिव्यांग तर 118 वृद्ध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.या दोन दिवसात एकूण 131 मतदारांनी गृह भेटीत मतदान केले. या पथकांसाठी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांनी रूट गाईडची भूमिका बजावली. 

सदर प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन, नायब तहसीलदार पंकज मगर, नितीन बाहीकर, निरंजना पराते,विवेक चांदवडकर, हिरा हिरे, लिपिक सुनील महाजन, रवींद्र शेळके, निवृत्ती नागरे तसेच पथकातील सर्व निवडणूक कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.


येवला मतदारसंघातील निवडणुक कार्यासाठी आदेशित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण हे 12 मे रोजी सकाळी 9 ते 5 वाजे दरम्यान महात्मा फुले नाट्यगृह येवला आणि स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथे दोन सत्रात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार टपाली मतदानास पात्र असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सोय प्रशिक्षण स्थळी उपलब्ध करून दिलेली आहे, अशी माहिती अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन यांनी दिली.
थोडे नवीन जरा जुने