येवला येथे मतदान केंद्रा निहाय आढावा बैठक संपन्न

येवला येथे मतदान केंद्रा निहाय आढावा बैठक संपन्न
येवला  : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, अंतर्गत 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर मान.निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशान्वये तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली येवला मतदार संघातील मुख्याध्यापकांची आढावा बैठक संपन्न झाली.

बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मतदान केंद्रनिहाय माहिती घेतली तसेच नुकसान झालेल्या केंद्राची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. 

त्यानंतर उपस्थितांना मतदान केंद्रासाठी आवश्यक फर्निचर उपलब्ध करून प्रत्येक मतदान केंद्रासाठी आदर्श सेटअप रचना करण्याच्या सूचना दिल्या.मतदान केंद्रावर आवश्यक तितके टेबल,खुर्ची,बसण्यासाठी बाक असावेत.मतदान केंद्रा शेजारीच पाळणाघर, हिरकणी कक्ष तसेच प्रतीक्षालयासाठी स्वच्छ व रिकामी खोली उपलब्ध करून देण्याचे सुचित केले. 

प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी,वीज यांची सोय असणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर विजेची  तसेच पंखा,विजेचा दिवा,चार्जिंग पॉइंट या बाबींची तपासणी करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना दिले.

उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदारांना ऊन लागू नये यासाठी 81 मतदान केंद्रावर सावलीसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे  याबाबत माहिती दिली.

यानंतर गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय मुख्याध्यापकांशी संवाद साधत भौतिक सोयी सुविधांचा आढावा घेतला. त्याचबरोबर मतदान केंद्र आणि परिसर तसेच स्वच्छतागृह यांच्या स्वच्छतेबाबत देखील मार्गदर्शन केले.

या बैठकीसाठी मुख्याधिकारी किरण देशमुख, नायब तहसीलदार पंकज मगर, नितीन बाहीकर,उपमुख्य अधिकारी राहुल पगार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे,बीएलओ समन्वयक रवींद्र शेळके, लिपिक सुनील महाजन, सर्व बीएलओ पर्यवेक्षक आणि 320 मतदान केंद्रातील मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने