लोकशाहीच्या उत्सवासाठी, कर्मचाऱ्यांचा उत्साह

लोकशाहीच्या उत्सवासाठी, कर्मचाऱ्यांचा उत्साह


येवला : पुढारी वृत्तसेवा

२०,दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक २० मे २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने येवला विधानसभा मतदारसंघात एकूण ३२० मतदान केंद्राकरिता मतदान पथके उत्साहाने रवाना झालेली आहेत. 

मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले असून प्रशासनाचे युद्ध पातळीवर कार्य सुरू आहे . निवडणूक कार्यासाठी २५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

आज सकाळी या पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी येवला तहसील येथे निवडणूक साहित्य ताब्यात घेण्यासाठी अतिशय उत्साहात आलेले होते. या सर्वांची आसन व्यवस्था भव्य मंडपात करण्यात आली होती.
या ठिकाणी बुथनिहाय ईव्हीएम, व्हीव्हीपॅट ,मतदार याद्या व इतर निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य वाटपासाठी कर्मचारी त्यांच्या पथकांप्रमाणे हजर होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे.त्याअंतर्गत पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांसह ४५० पोलीस कर्मचारी व ३०० होमगार्ड यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे. 

सदर पथकांना सुरक्षितपणे  मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी १२७ शासकीय व खाजगी अधिक्रमित वाहनांचा ताफा  सज्ज आहे.सदर वाहनांवर जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून ट्रॅकिंग करण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी वैद्यकीय पथक तैनात होते.तसेच कर्मचाऱ्यांसाठी अल्पोपहार,थंड पिण्याचे पाणी यांची सोय करण्यात आली होती.
 
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, केंद्रस्तरीय मतदानअधिकारी,तलाठी,कोतवाल शिपाई व इतर आस्थापना कर्मचारी मेहनत घेत आहे.

सोमवार,दिनांक २० मे रोजी सर्व मतदारांनी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, बाबासाहेब गाढवे यांनी मतदारांना केले आहे.

तसेच मतदारांना आवाहन करताना अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन यांनी,
मतदान केंद्रावर मतदारांच्या सोयीसाठी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी व स्वयंसेवक तैनात केलेले आहेत तरी सर्वांनी आपले मतदान करून लोकशाही बळकट करण्यास हातभार लावावा. असे प्रतिपादन केले.
थोडे नवीन जरा जुने