श्री महेश नवमीनिमित्त येवल्यात मिरवणूक
रक्तदान, वृक्षरोपण आदि उपक्रमांनी श्री महेश नवमी उत्सव साजरा
येवला : पुढारी वृत्तसेवा
येथील माहेश्वरी मंडळातर्फे आयोजित शनिवारी विविध कार्यक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी केली. येवला माहेश्वरी समाज व श्री माहेश्वरी युवक व महिला मंडळातर्फे महेश नवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. फुलांनी सुंदर सजविलेल्या पालखीत भगवान श्री महेश यांच्या प्रतिमेच्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेतील माहेश्वरी महिला व पुरुष शोभायात्रेत विशेष आकर्षण ठरले.
माहेश्वरी समाज उत्पत्ती दिन अर्थात श्री महेश नवमीनिमित्त येवला माहेश्वरी समाज, श्री माहेश्वरी युवक व महिला मंडळातर्फे दरवर्षी शोभायात्रा काढण्यात येते. यंदाची शोभायात्रा लक्ष्मी नारायण मंदिरापासून सुरू झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी व माहेश्वरी युवक मंडळ पदाधिकारी तसेच माहेश्वरी महिला मंडळ सदस्या सहभागी झाले होते. श्री महेश यांच्या प्रतिमेची ठिकठिकाणी पूजा करण्यात आली. 'जय महेश' च्या जयघोषात निघालेल्या शोभायात्रेत भगवान शंकर, पार्वती व श्री गणेश यांच्या वेशभूषा केलेल्या तसेच झांज व ढोल पथकात सामील झालेल्या लहानग्यांनी लक्ष वेधले.
महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मंडळाच्या वतीने क्रिकेट तसेच धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान वेल्थ मॅनेजमेंट व डिजिटल मार्केटिंग वर सचिन मुंदडा व योगेश लड्ढा यांचे व्याख्यान झाले. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. जयंती उत्सव निमित्त ५० कदंब वृक्षांचे रोपण करण्यात आले. लक्ष्मी नारायण मंदिरात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.