अतिवृष्टीची भरपाई तुटपुंजी... घोषणेनुसार पूर्ण रक्कम द्या: राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदेंची शासनाकडे मागणी
येवला :
येवला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी, शासनाकडून आलेले अनुदान हे अत्यंत 'तुटपुंजे' असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे नेते माणिकराव शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मोठी रक्कम देण्याची घोषणा केली असताना, प्रत्यक्षात केवळ साडे आठ हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान आले, जे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या निकषाप्रमाणे नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
माणिकराव शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी नुकसानीसाठी मोठी रक्कम देण्याची घोषणा केली होती, परंतु प्रत्यक्षात आलेले अनुदान तुटपुंजे आहे. त्यांनी शासनाला मागणी केली आहे की, दिलेल्या घोषणेची पूर्तता करावी आणि पूर्ण रकमेचे अनुदान शेतकऱ्यांच्या पदरात पाडावे.
यासोबतच, त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले हे अनुदान कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याच्या कर्जामध्ये किंबहुना इतरत्र वळणती करण्यात येऊ नये. आलेले अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावे.
अनुदान मिळवण्यासाठी महत्त्वाचे आवाहन
शिंदे यांनी माहिती दिली की, यासंदर्भात तहसीलदार अशी चर्चा केली असता अनुदानाचे काम ५० टक्क्यांहून अधिक अपूर्ण आहे, कारण अनेक शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत.
तहसीलदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर, ई-केवायसी (e-KYC) पोर्टल बंद असले तरी, शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.अनेक शेतकऱ्यांचे खाते एकत्रित (संयुक्त) असल्यामुळे अनुदान अडकले आहे. अशा सर्व शेतकरी बांधवांना आणि सहखातेदारांना त्यांनी विनंती केली की, इतर सहसदस्यांची संमती घेऊन त्याप्रमाणे शासनाच्या तहसील कार्यालयात अनुदानाची कागदपत्रे त्वरित पूर्ण करावीत आणि अनुदान पदरात पाडून घ्यावे.
यावेळी बोलताना माणिकराव शिंदे यांनी, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि घोषणेनुसार पूर्ण भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली.


