येवलेकरांसाठी सुवर्णक्षण; मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी अखेर येवल्यातील डोंगरगावात....
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी डोंगरगाव येथे होणार जलपूजन
येवला : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या मांजरपाडा प्रकल्पातील पाणी दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्यातून अखेर येवला तालुक्यातील डोंगरगाव साठवण तलावात प्रवाहित झाले आहे. या पाण्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते डोंगरगाव साठवण तलाव येथे शनिवार दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जलपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती येवला लासलगाव विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पाणी येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत पोहोचविण्यासाठी पुणेगाव - दरसवाडी - डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यासाठी २४२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याने अतिशय विक्रमी वेळेत मांजरपाडा धरणातून पाणी दरसवाडी व दरसवाडीतून येवला तालुक्यात डोंगरगावच्या दिशेने प्रवाहित झाले आहे. या पाण्यामुळे येवला तालुक्यातील तीन पिढ्यांचे स्वप्न साकार होत आहे.
त्या निमित्ताने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शनिवार दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता डोंगरगाव साठवण तलाव येथे जलपूजन करण्यात येणार आहे. या जलपूजन सोहळ्यास उपस्थित राहून या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन येवला लासलगाव विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले आहे.