*नागरिकांच्या आवश्यक सेवा-सुविधांची कामे जलद गतीने पूर्ण करावीत*
*:मंत्री छगन भुजबळ*
*नाशिक, दि. 12 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा):* येवला व निफाड तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत व आवश्यक सेवा सुविधांची कामे जलद गतीने पूर्ण करावीत. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करून कामे मार्गी लावण्यात यावी असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
आज येवला व निफाड तालुक्यातील विविध कामांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, येवला प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड प्रांत अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार आबा महाजन, निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडी, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .सुधाकर मोरे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, निफाड गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुमेरसिंग पाकळ,एच.बी.चव्हाण, उपअभियंता श्री.मोहिते, उपअभियंता कुलकर्णी, शाखा येवला नगरपालिकेचे शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शरद कातकाडे, डॉ. सुजित कोशिरे, कृषी अधिकारी शुभम बेरड, पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे, येवला उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दिपक लोणारी, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, मकरंद सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, अल्केश कासलीवाल, बाळासाहेब गुंड,भगवान ठोंबरे, सुभाष गांगुर्डे, देविदास निकम, यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री भुजबळ म्हणाले की,लासलगाव विंचूर चौपदरी काँक्रीट रस्ता कामाला तात्काळ सुरुवात करावीआणि म्हसोबा माथा खेडलेझुंगे रस्त्याच्या कामाला गती द्यावी. तसेच मार्गांवरील खड्डे तातडीने भरावेत. पिंपळस ते येवला चौपदरी काँक्रीट रस्त्याचे पस्तीस टक्क्यांपर्यंत काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात यावे. पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शिरवाडे व देवगाव येथे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाला सादर करण्यात आले आहे. कोटमगाव येथे होणाऱ्या नवरात्र यात्रेच्या अनुषंगाने भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करावी. १३ ऑक्टोबर 2025 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमांसाठी रस्ते दुरुस्ती, वीज व पाणी यासह आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. या ठिकाणी स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. तसेच पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा. येवला मुक्ती भूमीच्या संरक्षक भिंतीचे काम 13 ऑक्टोबरच्या आत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी यावेळी दिल्या.
यावेळी येवला व ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पिण्याच्या पाण्याची स्थिती,पालखेड डावा कालवा ओव्हरफ्लो रोटेशन,पुणेगाव दरसवाडी आणि दरसवाडी डोंगरगाव कालवा आवर्तन, येवला शहर पिण्याच्या पाण्याची स्थिती, धुळगाव व १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची स्थिती यांचाही आढावा घेतला. पालखेड तसेच पुणेगाव दरसवाडी पाण्याने सर्व बंधारे भरण्यात यावेत. अहिल्याबाई होळकर घाटावर पाणी सोडण्याच्या दृष्टीने पालखेड कालव्यावर एस्केप गेट बसविण्यात यावे. अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने येवला शहर स्वच्छता राहील यादृष्टीने नियोजन करावे.राजापूर व ४० गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची राहिलेली कामे व पाइपलाइनची त्वरेने कामे पूर्ण करावी विंचूर लासलगाव सह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जुनी कामे तातडीने पूर्ण करून नवीन प्रशासकीय मान्यतेमधील कामे सुरू करावीत.येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृहाची पहिल्या टप्प्यात राहिलेली कामे पूर्ण करावी. स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे स्मारकाच्या कामास निधी उपलब्ध असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावी. पावसाळा संपल्यानंतर येवला शहरातील भुयारी गटार योजनेची कामे, व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वाटप पूर्ण करण्यात यावे व येवला शहर मलनिस्सारण प्रकल्प २.० प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या.
लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावे. लासलगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी.विंचूर लोणगंगा नदी व लासलगाव शिवनदी नदी संवर्धन प्रकल्पाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे तातडीने सुरू करावे.लासलगाव येथील संजय नगर परिसरातील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावावा. ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली आहे त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. यासह शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा. तसेच घरकुलापासून पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शासनाच्या निर्देशाप्रमाणे भटक्या विमुक्त नागरिकांसह आदिवासी विद्यार्थ्यांच्या जातीच्या दाखल्यांसह विविध दाखल्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश मंत्री श्री भुजबळ यांनी दिले.