*मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश....*
*मनमाड- धर्मबाद एक्स्प्रेस पॅसेंजरसाठी येवला तालुक्यातील तारूर रेल्वे स्टेशनवर थांबा पुन्हा सुरू*
*मनमाड धर्माबाद एक्सप्रेसचे तारुर रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत*
येवला, दि.१० सप्टेंबर :-* मनमाड- धर्माबाद ही एक्स्प्रेस पॅसेंजर रेल्वे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना जोडते. परंतु या रेल्वेचा आपल्या येवला तालुक्यातील तारूर थांबा कोविड काळात रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरातील रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरवा केला. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून पाच वर्षानंतर तारुर रेल्वे स्थानकात थांबा पूर्ववत सुरू करण्यात आला. आज तारुर रेल्वे स्थानकात गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी चालकांचा सन्मान करण्यात येऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, संजय पगारे, अशोक कुलधर, विजय खैरनार अमीर शेख, जमील शेख, रौफ पटेल, अनीस पटेल, हमीद पटेल, मोतीराम पवार, बाजीराव जाधव, हारून पटेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या गाडीच्या थांब्याबाबत दि. १८ जून २०२४ रोजी रेल्वेमंत्री मा. अश्विनीजी वैष्णव पत्र लिहून हा थांबा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच दि. २८ जून २०२५ रोजी पुन्हा पत्र लिहून यासंदर्भात मागणी मांडली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मनमाड- धर्माबाद एक्स्प्रेस पॅसेंजरसाठी हा थांबा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
येवला-लासलगाव मतदारसंघाच्या पूर्व भागातील लोकांच्या दृष्टीने छ. संभाजीनगरसह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी मनमाड- धर्माबाद ही एक्स्प्रेस पॅसेंजर अतिशय महत्त्वाची आहे. तसेच तारूरसह या परिसरातील अंगुलगाव, सायगाव, धामणगाव, अंदरसूल या गावांसाठी हे रेल्वे स्टेशन जवळ आहे. या रेल्वेला तारूर येथून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. त्यामुळे शेतकरी, व्यापारी यांना संभाजीनगर येथे जाण्यासाठी, नागरिकांना उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात विविध खटल्यांच्या सुनावणी वगैरे जाण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना रोटेगाव आदी ठिकाणी शिक्षणाकरिता जाण्यासाठी ही रेल्वे महत्त्वाची आहे.
परंतु थांबा बंद असताना तारूर परिसरातील रेल्वे प्रवाशांना या रेल्वेत बसण्यासाठी नगरसूल, रोटेगाव येथे जावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाऊन गैरसोय होत होती. आता तारूर येथून पुन्हा थांबा सुरू झाल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार यांची गैरसोय दूर झाली असून त्यांचा वेळ आणि खर्च देखील वाचणार आहे.



