येवल्यातील अतिवृष्टीग्रस्त १२४ गावांवर 'पालक अधिकारी' नियुक्त...
पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू
येवला:
दिनांक २७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी येवला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे आणि तहसीलदार आबा महाजन यांच्या आदेशानुसार, तालुक्यातील १२४ गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी 'पालक अधिकाऱ्यांची' नियुक्ती करण्यात आली आहे.
येवला, अंदरसुल, नगरसुल पाटोदा सावरगाव अंगणगाव राजापूर आणि जळगाव नेऊर या सर्व आठ महसूल मंडळातील गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश असलेल्या पथकांना पंचनाम्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासोबतच, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी ई-पीक पाहणी पूर्ण करणे आणि 'अॅग्रीस्टॅक' योजनेसाठी आवश्यक असलेला 'फार्मर आयडी' तयार करणे बंधनकारक आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्याची जबाबदारीही पालक अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या तरतुदी लागू असल्याने, पंचनाम्यात हलगर्जीपणा किंवा चुका आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.