येवल्यात लवकरच होणार RTO उपप्रादेशिक परिवहन कार्यालय
मंत्री छगन भुजबळ यांच्या शिफारशीच्या अनुषंगाने येवल्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन आयुक्तांना आदेश
येवल्यातील नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आवारात प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्र (RDTC) स्थापन करण्याची मंत्री छगन भुजबळ यांची मागणी
येवला :
येवल्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन आयुक्तांना आदेश दिले आहे. त्यामुळे येवल्यात लवकरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना याबाबत शिफारस केलेली होती. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहे.
येवला जि. नाशिक येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी दि. ९ मे २०२४ रोजी परिवहन आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठविलेला होता. परिवहन आयुक्त मुंबई यांचे दि. ७.६.२०२४ चे पत्रान्वये एखाद्या जिल्ह्याचे विभाजन झाल्याशिवाय स्वतंत्र परिवहन कार्यालय स्थापन न करण्याचे शासनाचे धोरण असल्यामुळे येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करता येणार नाही असे कळविले आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आणून दिले आहे की,सन २०२४ नंतर चाळीसगाव जि. जळगाव, भडगाव जि. जळगाव, फलटण जि.सातारा, उदगीर जि. लातूर, खामगाव जि. बुलढाणा, वैजापूर जि.छ. संभाजी नगर व जत जि.सांगली या ७ ठिकाणी नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालये निर्माण करण्यात आलेली आहे. जळगाव, सातारा, लातूर, बुलढाणा, छ. संभाजी नगर आणि सांगली या जिल्ह्यांचे विभाजन झालेले नसतानांही या ठिकाणी ही कार्यालये निर्माण करण्यात आली. मात्र येवला येथे कार्यालय निर्माण करण्यासाठी जिल्ह्याच्या विभाजनाचे कारण देऊन येवल्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.त्यामुळे येवला येथे सुद्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय निर्माण करण्यासाठी तातडीने परिवहन आयुक्तांकडून प्रस्ताव मागवावा असे भुजबळ यांनी प्रताप सरनाईक यांना सांगितले.
सद्यस्थितीत येवला तालुक्यातील वाहनांची नोंदणी नाशिक उपप्रादेशिक कार्यालयामार्फत केली जाते. येवला ते नाशिक हे अंतर ८० किमी असून नागरिकांना वाहन संदर्भात कामाच्या दृष्टीने गैरसोयीचे होते. येवला तालुक्यातील वाहन नोंदणी संख्या आणि एकूण लोकसंख्या यांचा विचार करता येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. येवला येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय निर्माण करण्यासाठी जागा सुद्धा आरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे येवला जि. नाशिक येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात यावे अशी मंत्री छगन भुजबळ यांची मागणी आहे.
*प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्र (RDTC) स्थापन करण्यास केंद्राला शिफारस पाठवावी*
त्याचबरोबर येवला येथील नियोजित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येवला येथे प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्र (RDTC) स्थापन करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांना प्रस्तावित करण्यात यावे अशी मागणी देखील मंत्री छगन भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १५ व्या वित्त आयोगाच्या (२०२१-२५) पंचवार्षिक योजनेच्या काळात ₹५ कोटी आणि ३ एकर जमीन अशा तरतुदीसह कमी क्षमतेच्या प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्रांचा (RDTCs) दुय्यम पातळीवरील नवा घटक अंतर्भूत करण्यात आला. व्यावसायिक वाहन चालकांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देणे, रस्ते आणि पर्यावरण सुरक्षा यांची स्थिती सुधारणे आणि रस्त्यांवरील वाहतूक सशक्त करणे या उद्देशाने वाहन चालविण्याची चाचणी देण्याचा मार्ग उपलब्ध असलेले सर्व सुविधायुक्त प्रशिक्षण केंद्र उभारणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. या योजनेअंतर्गत, पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT) ही कार्यक्रम देखरेख एजन्सी म्हणून काम करते. याव्यतिरिक्त, योजनेअंतर्गत प्रत्येक RDTC च्या बांधकाम आणि ऑपरेशनवर देखरेख करण्यासाठी केंद्र सरकार, संबंधित राज्य सरकार आणि खाजगी प्रवर्तक यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक सोसायटी स्थापन केली जाते.
या संस्थांमध्ये चालणारी प्रमुख कार्ये आणि कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
१. अवजड मोटार वाहन चालविण्यासाठी प्रारंभिक (इंडक्शन) प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करणे
२. हलके मोटार वाहन चालविण्यासाठी प्रारंभिक (इंडक्शन) प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करणे
३. खासगी चालक प्रशिक्षण केंद्रांमधील प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम घेणे
४. धोकादायक वस्तूंची सुरक्षित वाहतूक करण्यासंदर्भातील तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करणे
५. धोकादायक वस्तूंची सुरक्षित वाहतूक करण्यासंदर्भातील एक दिवसीय उजळणी प्रशिक्षणाचे आयोजन करणे
६. सेवेत कार्यरत असणाऱ्या चालकांसाठी उजळणी व अभिमुखता प्रशिक्षणाचे आयोजन करणे
७. विविध संघटनांतर्फे आलेल्या चालकांची चाचणी परीक्षा घेऊन निवड करणे
*प्रतिक्रिया....*
येवला शहर लगत येवला हद्दीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय साठी 5.89 हेक्टर जागा आरक्षित आहे. सदर जागा प्रादेशिक परिवहन विभागास हस्तातरण करणे कामी कार्यवाही करण्याच्या सूचना मा.ना.छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी नाशिक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांना केल्या आहेत.यातील 3 एकर जागेत प्रादेशिक परिवहन कार्यालय सोबतच चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी मा. ना.छगनरावजी भुजबळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे केलेली असून हे प्रशिक्षण केंद्र प्रस्तावित आहे. हे नाशिक मधील अद्यावत एकमेव चालक प्रशिक्षण केंद्र असणार आहे.
डॉ.मोहन शेलार
मा गटनेते पंचायत समिती येवला