गुणवंत विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी संभाजी पवारांकडून ५१ हजारांची पारितोषिके जाहीर

 गुणवंत विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी  संभाजी पवारांकडून ५१ हजारांची पारितोषिके जाहीर

सावरगाव विद्यालयात स्वातंत्र्य दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव,प्रभातफेरी व कवायत संचलन




येवला, ता. १६ : सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम. जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी माजी सभापती संभाजी पवार यांनी सुमारे ५१ हजार रुपयांची पारितोषिके जाहीर केली. 

प्राचार्य डी. बी. नागरे व पर्यवेक्षक गजानन नागरे यांच्या नियोजनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.आखीव-रेखीव नियोजन, विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध प्रभातफेरी, कवायत संचलन, सुंदर परिपाठ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण होते.

कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोद पाटील, सहसेक्रेटरी प्रवीण पाटील, माजी सभापती संभाजी पवार, युवा नेते गोरख पवार, माजी सरपंच प्रसाद पाटील आदीना निमंत्रित करण्यात आले होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी विद्यार्थ्यांची ‘भारत माता की जय’च्या जयघोषात गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ध्वजारोहण करण्यात आले.विद्यालयाच्या प्रांगणात माजी सभापती संभाजी पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सरस्वती माता व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन तसेच ध्वजपूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी यावेळी सुंदर परिपाठ सादर केला.विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध कवायतीने उपस्थितांची दाद मिळवली.

इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यकर्ते बबन काटे व दिनकर पवार यांच्या वतीने रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. तसेच १९७८-७९च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनेही दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात आले.लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनाही विद्यालयाच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

●विद्यार्थ्यांवर बक्षिसांची बरसात

दहावीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या परिपाठाचे उपस्थितांनी कौतुक केले. श्रीराम दरबार गुरुकुलातील विद्यार्थी समर्थ चौधरी तसेच इयत्ता नववीतील अंश तिवारी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाबद्दल उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी रोख बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला.मागील वर्षी स्नेहसंमेलनानिमित्त विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना सुमारे २० हजार रुपयांच्या ट्रॉफी देण्यात आल्या होत्या. यंदा विद्यार्थ्यांना सुमारे ५१ हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे देण्यात येतील, अशी घोषणा संभाजी पवार यांनी केली. तसेच संस्थेचे माजी प्राचार्य झेड. डब्ल्यू. ताडगे यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली.विद्यालयाचा परिसर, शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची शिस्त आणि कार्यक्रमाचे नियोजन यांचे उपस्थित ग्रामस्थ व पालकांनी कौतुक केले.कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डी. बी. नागरे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. पर्यवेक्षक गजानन नागरे यांनी प्रास्ताविक केले. वसंत विंचू यांनी सूत्रसंचालन केले, तर कैलास मोरे यांनी कवायत संचलन केले. संतोष विंचू यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने