स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 'नाना टर्फ चॅम्पियन' स्पर्धा संपन्न; 'शिवनेरी स्नायपर' ठरला चॅम्पियन!

 स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 'नाना टर्फ चॅम्पियन' स्पर्धा संपन्न; 'शिवनेरी स्नायपर' ठरला चॅम्पियन!



येवला : संवाददाता 


देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 'पुंडलिक नाना स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित 'नाना टर्फ चॅम्पियन' क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार समारोप झाला. या अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक स्पर्धेत 'शिवनेरी स्नायपर' संघाने नेत्रदीपक विजय मिळवत प्रथम क्रमांकाचा मानाचा चषक आपल्या नावावर केला.

या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात परिसरातील नामांकित ८ संघाना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये शिवनेरी स्नायपर, प्रतापगड वॉरियर, तोरणा टायगर, रायगड चॅलेंजर्स, पुरंदर पॅंथर, सिंहगड स्ट्रायकर, रामशेज लॉयन्स आणि देवगिरी फायटर या आठ संघ यांनी अत्यंत जोशपूर्ण सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा अंतिम सामना 'शिवनेरी स्नायपर' आणि 'प्रतापगड वॉरियर' या दोन बलाढ्य संघांमध्ये अतिशय रंगतदार वातावरणात खेळला गेला. या अंतिम सामन्यात शिवनेरी स्नायपरने उत्कृष्ट खेळ करत नेत्रदीपक विजय मिळवला.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुंडलिक नाना स्पोर्ट्सचा स्तुत्य उपक्रम:


सध्या येवला शहरातील अनेक खेळाडू बॉक्स क्रिकेटच्या टर्फ संस्कृतीमुळे राज्यभरात चमकत आहेत. या नामांकित आणि नवीन खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ व प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने पुंडलिक नाना स्पोर्ट्सचे संचालक बंडू नाना शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त एक मोठा उपक्रम राबवला. त्यांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क  न आकारता एकूण ८ संघांमधील ६४ खेळाडूंना दोन दिवस 'नानाज् टर्फ' पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिले. तसेच स्पर्धेसाठी लागणारे सर्व क्रीडा साहित्यही आयोजकांच्या वतीने भेट देण्यात आले, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अक्षय मुंडे, अक्षय खेरूड, अंकुश करमासे, हर्षल मुंडे, संजय ठाकूर, सनी शेलार, संकेत खानापुरे, तुषार कुक्कर, चेतन कदम, कुशल नाकोड, ओंकार मिस्कीन, अतुल पवार आणि अमित माळी,यश गायकवाड ,मयुर बेलदार, आयुष माळवे यांच्यासह सर्व खेळाडूंनी अतिशय परिश्रम घेऊन उत्कृष्ट नियोजन केले.

विजेत्या 'शिवनेरी स्नायपर' संघासह सहभागी सर्व खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, या यशस्वी स्पर्धेमुळे येवल्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने