येवल्यात खळबळ! जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरूणाचा उपजिल्हा रुग्णालयासमोरच निर्घृण खून १६ जणांवर गुन्हा दाखल; ममदापूर तांड्यावरील कौटुंबिक वादाचा भयंकर अंत

 





येवल्यात खळबळ! जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरूणाचा उपजिल्हा रुग्णालयासमोरच निर्घृण खून

१६ जणांवर गुन्हा दाखल; ममदापूर तांड्यावरील कौटुंबिक वादाचा भयंकर अंत


येवला:   

जमिनीच्या हिश्श्यांच्या वाटणीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचे पर्यावसान अत्यंत भीषण हत्याकांडात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ममदापूर तांडा (ता. येवला) येथील अर्जुन भिमराव चव्हाण (वय २२) या तरूणाचा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच लाठ्या-काठ्या आणि लोखंडी गजाने जबर मारहाण करून खून करण्यात आला आहे. या थरारक घटनेमुळे येवला परिसरात प्रचंड भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी मयताचे वडील भिमराव जगन चव्हाण (वय ४६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात १६ संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिमराव चव्हाण आणि आरोपी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात जमिनीच्या वाटणीवरून जुना वाद सुरू असून, याप्रकरणी येवला दिवाणी न्यायालयात दावाही प्रलंबित आहे.
शनिवार, दि. २७ जून २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ममदापूर तांडा येथे याच जमिनीच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन वाद घातला, शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली.


रुग्णालयाबाहेरच गाठून केला प्राणघातक हल्ला....
या पहिल्या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी कुटुंबीय त्यांना घेऊन येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात आले होते. मात्र, आरोपींचा राग एवढ्यावरच शांत झाला नाही. रुग्णालयातही आरोपींनी येऊन पुन्हा शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
उपचार घेतल्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास अर्जुन चव्हाण हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघत असतानाच, उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर दबा धरून बसलेल्या आरोपींनी (अरुण राठोड, सुनील राठोड, दिनकर पवार, विजय राठोड, चेतन चव्हाण व इतर) बेकायदेशीर जमाव जमवून त्याला अडवले. त्यांच्या हातात असलेल्या लाठ्या, काठ्या आणि लोखंडी गजांनी अर्जुनच्या डोक्यावर, कानावर आणि छातीवर बेदम मारहाण सुरू केली. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने अर्जुनचा जागीच मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपींनी मयताच्या कुटुंबीयांनाही जिवे मारण्याची धमकी देत तिथून पळ काढला.

१६ जणांवर गुन्ह्याची नोंद; पोलिसांचा तपास सुरू....

या घटनेप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात आरोपी:
१) दादा जगन चव्हाण, २) भाऊसाहेब मोरसिंग राठोड, ३) अरुण मोरसिंग राठोड, ४) सुनील भाऊसाहेब राठोड, ५) दिनकर रामभाऊ पवार, ६) बन्सीबाई भाऊसाहेब राठोड, ७) जगन काळू चव्हाण, ८) न्यालूबाई जगन चव्हाण, ९) रेखा अरुण राठोड, १०) समाधान अरुण राठोड, ११) देवीदास मोरसिंग राठोड, १२) लीलाबाई देवीदास राठोड, १३) अभिषेक देवीदास राठोड, १४) विजय मोरसिंग राठोड (रा. निमगाव, राहता), १५) चेतन बाबूलाल चव्हाण (रा. मूळ डोंगरी, नांदगाव) आणि १६) सुनिता दादा पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत, येवला तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप  मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद अनमोल पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शासकीय रुग्णालयाच्या परिसरातच घडलेल्या या हत्याकांडामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने