दिंडोरी तास ते नांदुरमध्येश्वर जॅकवेल अॅप्रोच रोड बळकटीकरणाच्या ३ कोटी ८४ लाखांच्या कामाला प्रशासकीय मान्यता*
येवला -
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून विंचुर व येवला औद्योगिक क्षेत्रासाठी असलेल्या दिंडोरी तास ते नांदुरमध्येश्वर जॅकवेल अॅप्रोच रोड बळकटीकरणाच्या ३ कोटी ८४ लाखांच्या कामाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होऊन स्थानिक ग्रामस्थांचा दैनंदिन प्रवास सुलभ होणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक विभागामार्फत येवला विधानसभा मतदारसंघातील विंचुर व येवला औद्योगिक क्षेत्रासाठीच्या संयुक्त पाणीपुरवठा करण्यासाठी नांदुरमध्येश्वर धरणालगत जॅकवेल बांधलेले आहे. जॅकवेलसाठी असलेला पोहोच रस्ता ग्रामा ६३ हा अवजड वाहतुकीमुळे रहदारकरीता अतिशय खडतर झाला आहे. या खराब रस्त्यामुळे जॅकवेलवर ब्रेकडावून झाल्यास तो दुरूस्ती करण्यास खुप अडचणी येत होत्या. तसेच रस्त्याच्या कडेला घर बांधुन असलेले शेतकरी व वस्तीतील नागरिकांकडून सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीची आग्रही मागणी होती.
सद्यस्थितीमध्ये जुन्या १५० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन मुळे फक्त १००० m३/day एवढेच पाणी उचलता येते. विंचुर औद्योगिक क्षेत्राची रोजची मागणी १५०० m३/day एवढी आहे व त्यामुळे विंचुर औद्योगिक क्षेत्रास पाणी अपुरे पडत असल्यामुळे येवला औद्योगिक क्षेत्रास पाणीपुरवठा करता येत नसल्याने येवला औद्योगिक क्षेत्राचा विकास खुंटलेला आहे. या कामाची निकड लक्षात घेता सदर काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली होती. तसेच याबाबत त्यांचा सातत्याने पाठपुरावा देखील सुरू होता.
त्यानुसार विंचुर व येवला औद्योगिक क्षेत्रासाठी असलेल्या दिंडोरी तास ते नांदुरमध्येश्वर जॅकवेल अॅप्रोच रोड बळकटीकरणाच्या ३ कोटी ८४ लाखांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दिंडोरी फाटा ते नांदूरमध्यमेश्वर जॅकवेल या रस्त्याचा वापर विंचूर औद्योगिक क्षेत्राशी जोडणीसाठी तसेच धरण परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या कामामुळे रस्त्यावरून धरणाजवळील पाइपलाईन, वीजपुरवठा प्रकल्प, औद्योगिक वाहतूक,कृषी वाहतूक व स्थानिक ग्रामस्थांचा दैनंदिन प्रवास सुलभ होणार आहे.